BLOG: आदित्यभाई ‘केम छो’ ?

खरंतर मराठी माणूस आणि शिवसेनेचं नातं जुनं आहे.

आदित्य ठाकरे बँनर्स
मंगळवारी युतीचं घोडं अखेर गंगेत न्हालं. एकेकाळचा मोठा भाऊ आज छोट्या भावाच्या भूमिकेत आला आणि छोटा भाऊ मोठ्या भावाच्या. शिवसेना 124 तर भाजपा तब्बल 164 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चितही झालं. यावेळी या निवडणुकांमध्ये सर्वात महत्त्वाची आणि लक्षणीय ठरणारी निवडणूक म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघाची. याचं कारणही तसंच आहे म्हणा. चक्क वांद्र्याचे युवराजच या निवडणुकीत उतरल्यानंतर ही निवडणूक लक्षणीय झाली नाही तरच म्हणा. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी वरळी विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी वरळी हा ‘सेफ’ मतदारसंघ. तशीही त्यांची ही पहिलीच निवडणूक, ‘अनसेफ’ मतदारसंघातून निवडणूक लढवून चालणारही नाही. आजवर ठाकरे कुटुंबीयांमधील निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.

मुंबईतल्या वेगाने विकसित होणाऱ्या ठिकाणांमध्ये वरळीचा समावेश होतो. मराठी भाषिकांचं प्राबल्य आणि जुन्या मुंबईचे रहिवासी असलेले मतदार यामुळे गेले अनेक वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेच्याच ताब्यात आहे. केवळ 2009 चा अपवाद सोडला तर 1990 पासून सलग सहा निवडणुकांमध्ये मतदारराजाने शिवसेनेलाच साथ दिली आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या विभागाचा झपाट्यानं होणारा विकास आणि वाढत्या टॉवर्सच्या जाळ्यांमध्ये गुजराती भाषिक आणि अन्य भाषिकांचंही प्रमाणही झपाट्यानं वाढत आहे. तुलनेनं मराठी भाषिक कमी म्हणण्याऐवजी तितकाच राहिला तर अन्य भाषिकांच्या तुलनेत तो कमी झाला आहे. अशातच पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरे यांनी आता गुजराती भाषिकांनाही आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ‘केम छो वरली!’ असा प्रश्न विचारणारे आदित्य ठाकरे यांचे पोस्टर वरळी नाक्यावर झळकले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजराती भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठीच हे पोस्टर्स लावण्यात आल्याचं दिसून येत आहे. ‘मराठी माणूस’ आणि मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कांसाठी लढणारी सेना अशी शिवसेनेची ओळख होती. परंतु आता अशा सर्व प्रकारांमुळे त्यांचं मराठी प्रेम कमी होत आहे का? असा सवाल निर्माण होतो.

आदित्य ठाकरे यांच्या या पोस्टर्सनंतर मराठी भाषिकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवरुन शिवसेनेच्या गुजराती पोस्टरचा समाचार घेतला आहे. शिवसेनेचा वाघ आता ढोकळा खायला लागला अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असे बिरुद मिरवणारा पक्ष आता ‘केम छो वरली’ म्हणतोय वा रे राजकारण असेही एका नेटकऱ्याने म्हटले आहे. दादा काय झालं मराठीचा विसर पडला का? असे एका नेटकऱ्याने विचारले आहे. एकेकाळी मराठीसाठी रान उठवणाऱ्या शिवसेनेची भूमिका आता काळानुरूप बदलू लागली आहे.

खरंतर मराठी माणूस आणि शिवसेनेचं नातं जुनं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली असली तरी मुंबईची नाळ ही महाराष्ट्रापासून वेगळी होत होती. मराठी लोकांच्यासोबतच गुजराती आणि अन्य भाषिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. मुंबईत अनेक उद्योगही उदयास आले असले तरी त्या उद्योगांच्या चाव्या मात्र अमराठी लोकांच्याच हाती होता. मराठी माणसाला दुय्यम स्थान मिळतंय अशी भावनाही त्या काळी जोर धरू लागली होती. व्यापारातही गुजराती, मारवाडी आणि दाक्षिणात्य लोकांना प्राधान्य मिळत असल्यानं मराठी लोकांवर अन्याय होत असल्याच्या भावनेतून शिवसेने जन्म घेतला. आपल्या व्यंगचित्रांमधून व्यक्त होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ‘मार्मिक’च्या माध्यमातून मराठीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यास सुरूवात केली. त्यानंतर मराठी माणसाला संस्थात्मक पातळीवर एकत्र आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी 1 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसांना पाठिंबा देण्यासाठी दाक्षिणात्य लोकांविरोधात लुंगी हटाव, पुंगी बजाव ही मोहीम शिवसेनेने सुरू केली. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे त्या काळच्या शिवसेनेचे समिकरण होतं. आताच्या भूमिकेबाबत विचार न केलेलाच बरा. मराठी माणसाला शिवसेना आपलीशी वाटल्यानंच मराठी माणूसही शिवसेनेशी जोडला गेला आणि राज्यभर त्यांचा वेगाने विस्तारही झाला. ‘मुंबई आमची, नाही कुणाच्या बापाची’ हे समोरच्या ठणकावून सांगण्याची हिंमतही मराठी माणसाला बाळासाहेबांच्या शिवसेनेनेच दिली. पण पुढे सत्ताकारणात याच मराठी माणसाची जागा हिंदुत्वानं घेतली आणि मराठी माणूस हळूहळू बाजूला सारला गेला.

हिदुत्वाच्या मुद्द्यावर सरकार स्थापन झालं तरी मराठी माणसाला त्याचा कितपत फायदा झाला हा चर्चेचा विषय ठरेल. राज्यात सत्ता तसंच पालिकेवरही शिवसेना सत्तेत आली. काळानुरूप आर्थिक राजधानीत येणारे लोंढे वाढत गेले. त्यामुळे सत्तेत यायचं असेल तर परप्रांतीयांना जवळ करण्याशिवाय पर्याय नसल्याचं ध्यानात आल्यानंतर उत्तर भारतीयांचे मेळावेही आयोजित होऊ लागले. नव्या पक्षनेतृत्वाने उत्तर भारतीयांना सोबत घेण्याचीही भूमिका स्वीकारली. शिवसेनेने स्थापन केलेल्या शिवउद्योग सेनेचादेखील मराठी माणसाला कितपत फायदा झाला हादेखील चर्चेचा विषय ठरेल. अनेकदा निवडणुकांपूर्वी मराठीचा मुद्दा हाती घ्यायचा हे निवडणुकीचं समीकरणचं बनलं होतं. परंतु यावेळी मराठी भाषिकांचा मुद्दाही राज्याच्या निवडणुकीत बाजूला पडल्याचं दिसत असून गुजराती आणि अन्य भाषिकांना नव्या पोस्टर्सद्वारे आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या आता शिवसेनेच्याही मराठी माणसाच्या भूमिकेबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

 

जयदीप उदय दाभोळकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena yuva sena chief aditya thackeray contest from worli banners in other language gujrati tamil english blog jud

ताज्या बातम्या