Story Of The Indian Second Sex; ‘पण ट्रेंडी नको शाश्वत हवं’

सोशल मीडियावर हा सिनेमाचा ट्रेंड तयार झालाय.

the great -indian -kitchen-laila-aur-satt-geet

– नरेंद्र बंडबे

गेल्या काही दिवसांपासून अमॅझोन प्राईमवरच्या ‘द ग्रेट इंडियन किचन(२०२१)’ या सिनेमाची चांगली चलती आहे. सोशल मीडियावर हा सिनेमाचा ट्रेंड तयार झालाय. सिनेमाची गोष्ट एकदम साधी आहे. ही गोष्ट आपण पहिल्यांदा पाहतोय का तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. मग हा सिनेमा पॉप्युलर होण्यामागे एव्हढं काय कारण आहे. तर त्याचं उत्तर आहे सोशल मीडिया. चैन रिएक्शन आणि पीयर प्रेशरमुळं द ग्रेट इंडियन किचनला अच्छे दिन आलेत. फेमिनिजमच्या नावाखाली हा सिनेमाला खपवला जातोय. हा विचार फार वरवरचा आहे. आपण पितृसत्ताक समाजात राहतो आणि त्यातून घडणारी ही गोष्ट तशी फार काही नवीन नाही. सिनेमा पाहिल्यावर काही पुरुष बदलले तर बरंच होईल. नाही तर कहानी घर घर की पध्दतीनं घडलं तर काही दिवसांनंतर आपण सर्वच हे विसरुन जाऊ. कारण सोशल मीडियाचा ट्रेंड रोजच बदलता राहतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

द ग्रेट इंडियन किचनचा विचार करताना तो फक्त नवरा आणि बायकोचा विचार न करता तो संपूर्ण भारतीय समाजाचा व्हायला हवा. अगदी काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत व्हायला हवा. आपण जेव्हा द ग्रेट इंडियन किचनबद्दल लिहतो,बोलतो तेव्हा गेल्यावर्षी सर्वाधिक गाजलेल्या लैला और सत्त गीत (२०२०) या काश्मिरी सिनेमाचाही तेव्हढाच विचार व्हायला हवा. कारण तो ही भारताच घडतोय आणि याच्यातली बायको म्हणजे लैला ही तशीच आहे जशी या किचनमधली. कंबहुना लैला जास्त प्रभावी आहे. काश्मिर खोऱ्यातल्या महिलांची ही घुसमट आपल्याला पडद्यावर कधीतरीच दिसतं. कारण इथले सिनेमे ओटीटी किंवा सिनेमागृहात क्विचितच दिसतात. सध्या मळ्याळम भाषेतल्या सिनेमा पाहण्याचा ट्रेंड आहे. आणि सोशल मीडियाच्या चैन रिएक्शनमुळं तो व्हायरल होतोय. असो….

तर लैला और सत्त गीत (२०२०) मध्ये काश्मिरमधल्या लैलाची गोष्ट आहे. संपूर्ण सिनेमाभर तिचा स्वत:चा शोध आहे. पुरषी अहंकार ही आहे आणि स्त्रियांचं होणारं नेहमीचं दमन ही आहे. अश्या परिस्थितीत लैला आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतेय. ती कन्फुज आहे. पण तिला कात टाकायची आहे. तिला पिंजऱ्यातून बाहेर पडायचं आहे. तिनं तिचा मार्ग ही शोधलाय. एक तर निकाह करताना तिचं कबुल है येण्यापुर्वीच काझी शादी डिक्लेअर करतो. मग संपुर्ण सिनेमाभर ती स्वताला या नवीन नात्यासाठी तयार करतेय. गुलजारचं दिलसे मधलं सतरंगी रे हे गाणं आहे ना तसंच दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंह यानं लैलाची गोष्ट सात काश्मिरी लोकगीतांमध्ये सांगितली आहे. काश्मिरचं बॅकडॉप असल्यानं लैलाची प्रवास देवदार वृक्षांच्या दाटीवटीतून विस्तीर्ण डोंगररांगांपर्यंत झाला आहे.

द ग्रेट इंडियन किचन आणि लैला और सत्त गीत मध्ये एक समानता ती म्हणजे बेडमधलं पती-पत्नीचं नातं. तिला काय हवंय आणि तो काय करतोय हा समान धागा दोन्ही सिनेमात सापडतो. दोन्ही सिनेमातल्या या बेडसीनमधली समानता ही प्रत्येक भारतीयाच्या कुटुंबातली गोष्ट सांगते. याचा जास्त विचार व्हायला हवा. तिथं पुरुष हा फक्त त्या शरीरावर हक्क जागवणारा आहे. तिला काय हवंय हे त्याच्या ध्यानी मनी नाही. तिच्या विरोधाचीही त्याला तमा नाहीच.पुरुषाने हक्क गाजवण्याची ही प्रक्रिया फार जुनी आहे. अगदी अनादीकाळापासूनची. बासु भट्टाचार्य यांच्या पंचवटी (१९८६) सिनेमातली दीप्ति नवलनं साकारलेली साध्वी आणि या दोघी सिनेमातली मध्यवर्ती स्त्री पात्रं यांचा पोत सेम आहे. पंचवटीत साध्वीचा पती ही त्याला हवा तेव्हा आणि कुठे ही सेक्स करतोय. तिचा एक प्रश्न आहे जी ती तिच्या मैत्रिणीला विचारते, कोई कभी भी खाना खा सकता है क्या? यातुनचं समान वेवलेन्थ असलेल्या दिरासोबत तिचे संबंध येतात.

इथं सोमनाथ सेन यांच्या लिला (२००२) या सिनेमाचा उल्लेख करावासा वाटतो. त्यातल्या लिलाचं पात्र जास्त खमकं आहे. ती या दोघींपेक्षा जास्त शिकलेली आहे. भारतातून अमेरीकेत पोचलेय. पण तरीही लिला नात्याच्या प्रिजन ऑफ स्पींगमध्ये अडकलेय. नौशाद (लिलाचा लीव इन पार्टनर – विनोद खन्ना ) आणि क्रिश (लिलावर प्रेम करणारा तिचा विद्यार्थी – अमोल म्हात्रे) या दोघांना तिच्यावर हक्क गाजवायचा आहे. ज्याला ती नकार देते. लिलाची ही स्ट्रॉंग भूमिका डिंपल कापाडियानं केलीय.

लिला क्रिशला म्हणते “I am not creation of your making or Naushad . I don’t need anyone to validate me. I am tired of living for others, being a muse and inspiration. I just want to live myself. I want to be just me”
स्त्री-पुरुष नात्याबाबत लिला आणि पंचवटीमध्ये जे बाईचं प्रोजेक्शन करण्यात आलंय. त्यालाच लैला आणि किचन…मधली बायको पुढे घेऊन जाते. याचं समाधान आहे. पण अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे.

द ग्रेट इंडियन किचन व्यतिरीक्त बाकी तिनही सिनेमात ‘तिला’ आवडलेल्या इतर पुरुषाशी शरीर संबंधाच्या घटना आहेत. दिरापासून गर्भार राहिलेली पंचवटीतली साध्वी तिच्या नवऱ्याला माझ्या पोटात वाढणारं मुल तुझं नाही हे ठणकावुन सांगते. एका रात्री क्रिश सोबत सेक्स केलेली लिला त्याला माझ्यावर हक्क सांगू नकोस असं सांगते. तर लैला और सत गीतमधली लैला कात टाकतेय नव्याच्या आयुष्याच्या शोधात निघालेय. देवदारच्या खोऱ्यातून विस्तीर्ण पसरलेल्या पर्वत रांगामध्ये जाताना दिसतेय. तो तिनं निवडलेला मार्ग आहे. द ग्रेट इंडियन किचनमध्ये बायको घरातल्या पुरुषांविरोधात उभी ठाकते. घरातून बाहेर पडते.

हे सर्व पाहताना प्रसिध्द लेखिका अमृता प्रितम यांच्या काही ओळी आठवतात. “औरत की पाकिजगी का ताल्लुक समाज ने कभी भी औरत की मन की अवस्था से नही पहचाना हमेशा उसके तन से जोड दिया.”
एकूणच बाईच्या मनाचा विचार हा किचन पलिकडे व्हायला हवा. बाकी जे आहे हे असं आहे. ते ट्रेंडी नको तर पक्कं आणि शाश्वत हवंय. एव्हढंच.

 

(लेखक सदस्य FIPRESCI आणि टिव्ही पत्रकार असून त्यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Story of the indian second sex the movies like the great indian kitchen and laila aur sat geet are trending subject kpw

Next Story
Letter from Corona: …कळावे लोभ असावा; आपला कृपाभिलाषी ‘करोना’
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी