scorecardresearch

Premium

हरतालिका म्हणजे काय ? हरतालिकेची ‘ही’ कथा तुम्हाला माहीत आहे का ?

हरतालिका हे नाव तिला कसे प्राप्त झाले? हरतालिकेची कथा आणि भारतातील वेगवेगळ्या प्रांतात हरतालिका कशी साजरी करतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठ

story_of_haratalika
महाराष्ट्रातील हरतालिकेची पूजेतील मूर्ती (लोकसत्ता.कॉम)

भाद्रपद शुद्ध तृतीया ही हरतालिका तृतीया म्हणून साजरी करण्यात येते. बोली भाषेत या तृतीयेला हरताळका असेही म्हणतात. अनेक स्त्रिया या दिवशी चांगला पती मिळावा याकरिता, तसेच सौभाग्य सदैव राहावे, याकरिता उपवास करतात. हरतालिका हे पार्वतीचे नाव. परंतु, हरतालिका हे नाव तिला कसे प्राप्त झाले? हरतालिकेची कथा आणि भारतातील वेगवेगळ्या प्रांतात हरतालिका कशी साजरी करतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

हरतालिका नाव कसे प्राप्त झाले ?

हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरतालिका हा मूळ संस्कृत शब्द आहे. हरताळका हे बोली भाषेतील तिचे रूप झाले. हर म्हणजे हरण करणे, घेऊन जाणे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ असे म्हणतात. हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे. ‘शिवा भूत्वा शिवां यजेत् |’ शिवरूप होऊन शिवासाठी पूजा करावी.

Guru Chandal Yog 2023
‘गुरु चांडाळ योग’ संपताच ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? प्रचंड धनलाभासह प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता
Hindi Day
यूपीएससी सूत्र : हिंदी दिवसाचे महत्त्व काय? भारतात हिंदी भाषा किती बोलली जाते?
Pola festival in Mehkar now with modern tractor method
‘येथे’ भरतो बैलांऐवजी ट्रॅक्टर पोळा!, काय आहे कारण जाणून घ्या…
innovative initiative Khelo Chanda Chandrapur Zilla Parishad
“खेलो चांदा” उपक्रमातून ७५ क्रीडांगण निर्माण करणार; चंद्रपूर जिल्हा परिषदेचा उपक्रम

हरतालिकेची कथा

भविष्यपुराणात आलेल्या कथेनुसार, एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारले, ”देवा, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? कोणत्या पुण्याईमुळे मी आपली पत्नी झाले, हेही मला सांगा.” तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस.

हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केले. ६४ वर्षं, तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना म्हणजे हिमालयाला फार दु:ख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारदमुनी आले. तुझ्या वडिलांनी त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, ”तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. विष्णू तिच्यासाठी योग्य आहेत. त्यांनीच मला इथे पाठवले आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली.
नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. विष्णूच्या या स्थळाविषयी हिमालयाने पार्वतीला सांगितले. परंतु, तिला ही गोष्ट रुचली नाही. ती अत्यंत क्रोधित झाली. सखीने तिला रागावण्याचे कारण विचारले. तेव्हा पार्वतीने घडलेली हकीकत सांगितली. महादेवावाचून दुसरा पती करायचा नाही, असा तिचा ठाम निश्चय होता. परंतु, हिमालयाने तिच्यासाठी विष्णू वरला होता. सखीने तिला घोर अरण्यात नेले. तिथे एक नदी होती. सखी आणि पार्वतीने तिथे शिवलिंगाची स्थापना केली. पार्वतीने त्या लिंगाची मनोभावे पूजा केली. तो पूर्ण दिवस उपवास केला. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस होता. पूर्ण रात्र शंकराचे नामस्मरण केले. या व्रताच्या सामर्थ्याने शंकराचे कैलासावरील आसन हलले आणि त्याने तुला दर्शन दिले. वर मागण्यास सांगितल्यावर पार्वतीने शंकर आपले पती व्हावे ही इच्छा व्यक्त केली. शंकरांनी तथास्तु म्हटले.
पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा पार्वतीने विसर्जन केली. सखीसह उद्यापन केले. इतक्यात हिमालय पार्वतीला शोधत वनात आला. पार्वतीने निघून येण्याचे कारण सांगितले तसेच व्रताची हकीकतही सांगितली. हिमालयाने पार्वतीला शंकराशी विवाह करून देण्याचे वचन दिले आणि पार्वती घरी आली. यथावकाश पार्वती आणि शंकराचा विवाह झाला.
हे व्रत मनोभावे करण्याऱ्या कुमारिकांना त्यांचा इच्छित वर प्राप्त होईल. अशी कथा महादेवांनी पार्वतीला सांगितली.
(संदर्भ : भविष्यपुराण )

हरकालीची कथा

हरितालिकेच्या व्रतात उमा-महेश्वर यांचे पूजन केले जाते. प्रामुख्याने सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांत गणपतीच्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. या दोघांचे पूजन झाल्याशिवाय गणेश पूजन करायचे नाही अशी प्रथा आहे. तसंच महाराष्ट्रात ‘हरतालिका’ तृतीयेच्या दिवशी पूजण्याची प्रथा असली तरी दक्षिण भारतात मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीनं हरतालिकेचं व्रत केलं जातं. हरतालिकेच्या दिवशी सुवर्णगौरी व्रत असते. यात गौरीचा केवळ मुखवट्याची पूजा केली जाते. तर महाराष्ट्रात अनेक गावात समुद्रावरील वाळू किंवा शेतातली माती आणून सखी, पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथा आहे. ‘हरितालिका’ नावाशी जुळणारे पण वेगळ्या पद्धतीने विधी करण्यात येणारे ‘हरिकाली’ व्रत भाद्रपद शुक्ल तृतीयेला केलं जातं. या हरिकाली व्रतामागे एक कथा आहे, असं म्हणतात. दक्षकन्या श्यामवर्णा काली हिला शंकराने सर्वादेखत ‘काळी असलीस तरी मला तू खूप आवडतेस’ असे म्हटले. त्यामुळे कालीने चिडून हिरवळीवर स्वत:ची हरित सावली फेकली आणि अग्निप्रवेश करून ती हिमालयाची कन्या गौरी म्हणून जन्माला आली. तर सावलीतून ‘कात्यायनी’ देवी निर्माण झाली.
पुढे युद्धात ‘कात्यायनी’ देवीने देवांना मदत केली, ती नंतर ‘हरिकाली’ नावानं ओळखली जाऊ लागली. त्यामुळे भाद्रपद शुक्ल तृतीयेला काही ठिकाणी हरिकालीचेही व्रत केलं जातं. फक्त स्त्रियाच नाही पुरुष देखील तिची पूजा करतात. यात सुपामध्ये सात धान्ये पेरून त्यांचे अंकुर आले की त्यावर देवीचे आवाहन करून पूजन केले जाते. त्यानंतर पहाट उजाडायच्या आत तिचं विसर्जन करण्याची देखील प्रथा आहे.

प्रांतानुसार हरतालिका कशी साजरी करतात ?

हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून मुख्यतः दक्षिण भारतात अनेक कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. गुजरातमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका व्रत करत नाहीत. तामिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आभि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. उत्तर भारतात, काशी प्रांतातही हे व्रत केले जाते. भारताच्या बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या प्रांतातही हरतालिका हे व्रत महिला करतात. शैव आणि शाक्त संप्रदायात हरतालिका व्रताला अधिक महत्त्व आहे. काही महिला निर्जळी उपवास करतात. कोकणामध्ये ‘हरतालिका लागली/चढली’ असा वाक्यप्रयोग सहज केला जातो. ज्या महिलांना या उपवासाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हा वाक्यप्रयोग करतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is hartalika do you know this story of hartalika vvk

First published on: 17-09-2023 at 16:25 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×