मुंबई महापालिकेची निवडणूक सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. काही झाले तरी मुंबई जिंकायचीच, असा चंग सर्वच पक्षांनी बांधला आहे. युती, आघाडीबाबत चर्चा, शक्यता-अशक्यतांच्या चर्चांना ऊत आला असताना, मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी अशक्यच आहे, असे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आघाडी झाली तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आघाडी होणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे यांसह इतर महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सत्ताधारी शिवसेनेसमोर आपले वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान आहे. तर मुंबई महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत ‘कमळ’ फुलवायचेच, असा निर्धार भाजपने केलेला दिसत आहे. तर दुसरीकडे शहरी भागांत मतदारांचे पाठबळ मिळत असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर महापालिका निवडणुकीत आपले अस्तित्त्व दाखवून देण्याचे आव्हान आहे. त्यासाठी सर्वच नेत्यांची धडपड सुरू आहे. पुणे, ठाण्यात शिवसेनेसोबत जाण्यास विरोध करणाऱ्या भाजपला मुंबईत मात्र, शिवसेनेसोबत जायचे आहे, असे संकेत भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून मिळत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेलाही युती हवी आहे, असे संकेत ‘मातोश्री’वरून मिळत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, मुंबईत कोणत्याही परिस्थितीत आघाडी होणार नाही, काँग्रेससोबत आघाडी नकोच, असे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

आघाडीबाबत कोणतीही शक्यता नाही. आमच्याकडून कोणताही प्रस्ताव दिला जाणार नाही. राज्यात झाली तरी चालेल, पण मुंबईत आघाडी नको. मुंबईतील स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी आघाडी करू नये, असे मत मांडले होते. त्यांचे म्हणणे मी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसमोर मांडले आहे. वरिष्ठांकडूनही स्थानिक नेते, पदाधिकारी आघाडीचा निर्णय घेतील, असे सांगण्यात आले आहे. त्यांनीही हिरवा कंदील दिला आहे, असेही संजय निरुपम यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपवरही तोंडसुख घेतले. शिवसेना-भाजपमधील युतीबाबतच्या चर्चेबाबत विचारले असता, आम्ही ठरवले ते अंतिम असते. त्यांच्यासारखा आमचा स्वभाव अजिबातच नाही, अशा शब्दांत त्यांनी शिवसेना-भाजपवर टीका केली.