मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये घोळ झाल्याचे राजकीय पक्ष आणि मतदारांकडूनही सांगितले जात आहे. तर निवडणूक आयोगाने मुंबईतील ११ लाख मतदारांची नावे रितसर वगळली आहेत, असे सांगण्यात येत आहे. मतदारयाद्यांमधून वगळण्यात आलेले मतदार गेले कुठे? मतदार यादीतील घोळ याची चौकशी करण्यात यावी, असे आदेश स्थायी समितीने पालिका प्रशासनाला दिले आहेत.

मुंबईतील मतदारयाद्यांमधून वगळण्यात आलेली ११ लाख नावे आणि मतदारयाद्यांतील घोळाचे पडसाद स्थायी समितीच्या सभेत उमटले. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, असे आदेश स्थायी समितीने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. पुढील बैठकीत त्याचा अहवाल सादर करण्यात यावा, असे आदेशही महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईची सध्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी २४ लाख ४२ हजार ३७३ इतकी आहे. तर मतदार संख्या ९१ लाख ८० हजार ४९७ आहे. त्यात पुरूषांची संख्या ५० लाख ३० हजार ३६३ तर स्त्रीयांची संख्या ४५ लाख ६६ हजार २७३ आहे. मागील पाच वर्षांत म्हणजेच २०१२ मध्ये हीच लोकसंख्या १ कोटी १९ लाख ७८ हजार ४५० इतकी होती. गेल्या पाच वर्षांत साधारण ४ लाख ६३ हजार ९२३ इतकी लोकसंख्या वाढली आहे. मात्र मतदार संख्या ११ लाख ६ हजार ८२ इतकी घटली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी बोगस मतदानाच्या तक्रारी पुढे आल्याने निवडणूक आयोगाकडून बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी मोहिम राबविण्यात आली होती. यामध्ये सर्वेक्षण करून निवडणूक आयोगाकडून मुंबईतील ११ लाख नावे रितसर कमी करण्यात आली. ही नावे मतदार यादीत बोगस ठरत असल्याचे पुढे आल्याने आयोगाकडून संबंधित मतदारांना आपल्या माहितीची आणि नाव नोंदणीसाठीची मुदत देखील देण्यात आली होती. पण संबंधितांकडून कोणतीच प्रतिक्रिया न आल्याने अखेर निवडणूक आयोगाने रितसर नावे कमी केली होती, असा खुलासा निवडणूक आयोगाकडून देण्यात आला होता. मात्र, मतदार यादीतून नावे ‘गायब’ झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.