शिवसेनेचे खुले आव्हान

केंद्रात व महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करण्यास तुम्हाला कोणी रोखले आहे, असा रोखठोक सवाल करत, उगाच बदनाम करण्याचे ‘किरटे’ उद्योग यापुढे सहन केले जाणार नाहीत, असा सज्जड दम शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिला.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोपसत्र सुरू आहे. ठाकरे यांनी आपली संपत्ती जाहीर करावी अशी मागणीही सोमय्या यांनी केली असून त्याला पत्रकार परिषदेत उत्तर देताना केंद्रात व राज्यात तुमचीच सत्ता असताना ठाकरे यांच्या संपत्तीची चौकशी करण्यास तुम्हाला कोणी रोखले, असा सवाल राहुल शेवाळे यांनी केला. संपत्तीच जाहीर करायची असेल तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही संपत्ती जाहीर करा. अमित शहा यांनी आमदार असतानाची संपत्ती घोषित केली असली तरी त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या काळात किती संपत्ती बनवली याची माहिती त्यांनी जाहीर केलेली नाही, असा टोलाही शेवाळे यांनी लगावला. नोटाबंदी लादताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीस दिवसांत भाजपच्या सर्व मंत्री, खासदार, आमदार यांची संपत्ती जाहीर करण्यास सांगितले होते.

‘गडकरींना अडचणीत आणण्यासाठी..’

भाजप नेते नितीन गडकरी यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होऊ नये यासाठी पूर्ती घोटाळा बाहेर काढण्यात आला होता, असा आरोप शेवाळे यांनी केला.