मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडाचे निशाण फडकवणाऱ्या शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या आदेशानुसार एकूण २६ शिवसैनिकांचा समावेश असून यामध्ये सेनेच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये प्रभादेवीतील बंडखोर शिवसैनिक महेश सावंत, विद्यमान नगरसेविका शुभांगी शिर्के आणि घाटकोपरचे माजी विभागप्रमुख सुधीर मोरे यांचा समावेश आहे. ही कारवाई करून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेतृत्त्वाविरुद्ध आणि पक्षाविरुद्ध कोणतीही आगळीक खपवून घेतली जाणार नाही, असा कठोर इशारा दिला आहे.

पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बंडखोर कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी शिवसेनेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. ७ फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. त्यामुळे या वेळेत बंडखोरांची समजूत काढून त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न शिवसेनेने सुरू केले होते. यासाठी खासदार राहुल शेवाळे यांची बंडखोरांशी बोलणी सुरू होती. या बंडखोर शिवसैनिकांना संघटनेतील पदांचे आमिषही दाखविण्यात आले होते. मात्र, इतके करूनही बंडाचे निशाण मागे घेण्यास नकार देणाऱ्या शिवसैनिकांची आज अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. निवडणुकीच्या काळात शिवसेनेशी संबंध असल्याच्या कारणावरून या उमेदवारांना कोणतीही सहानुभूती मिळू नये म्हणून उद्धव यांनी ही कारवाई केल्याची चर्चा आहे.

गेल्या निवडणुकीत मनसेमुळे शिवसेनेला दादर आणि माहीम भागातील अनेक जागा गमवाव्या लागल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन दिवसांपूर्वी सेनेकडून उमेदवारांना विभागप्रमुखाच्या माध्यमातून एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते. तेव्हापासून उमेदवारी न मिळालेल्या अनेक नेत्यांनी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवला होता. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रभादेवी, दादर, लालबाग, परळ आणि माहीम या भागांमध्ये सर्वाधिक बंडखोरी पाहायला मिळाली होती. यापैकी काही बंडखोरांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला तर अन्यजणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रभादेवीतील शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या महेश सावंत यांनी बंड पुकारले आहे. महेश सावंत हे प्रभादेवी वॉर्ड १९४ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. माहिममधील वॉर्ड क्रमांक १९० मधून वैशाली पाटणकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या महिला शाखाप्रमुख रोहिता ठाकूर यांनी अपक्ष उमेदवार अर्ज भरून बंडखोरी केली आहे. माजी महापौर श्रध्दा जाधव यांच्या विरोधात तीन शिवसैनिकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर वॉर्ड क्रमांक ७७ मधून बाळा नर यांच्या विरोधातही चौघांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.