मुंबईत मतदारांतील १० लाखांची घट मतदानटक्कावाढीच्या पथ्यावर

मुंबईत सन २०१२ मध्ये झालेल्या महानगरपालिकेत जेमतेम ४५ टक्के मतदान झाले असताना काल, मंगळवारच्या मतदानात ही टक्केवारी तब्बल १० टक्क्यांनी वधारून ५५ टक्क्यांवर गेल्याचे दिसत असले तरी यावेळी मुंबईतील तब्बल १० लाख मतदार कमी झाल्याने ही वाढ म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी, विशेषत भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यासाठी एक चकवा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील ठाणे, उल्हासनगर, पुणे आदी इतर नऊ महापालिकांसाठी सरासरी ५६.३० टक्के, तर ११ जिल्हा परिषदांसाठी सरासरी ६९.४३ टक्के इतके मतदान नोंदवण्यात आले आहे. या निवडणुकीची मतमोजणी उद्या, गुरुवारी होणार असून, सगळ्यांचे लक्ष लागलेल्या मुंबईसह इतर ठिकाणची सत्ता कुणाला मिळते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेच्या सन २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत एक कोटी दोन लाख ८६ हजार मतदार होते. तर यावेळच्या निवडणुकीत सुमारे ९१ लाख ८० हजार मतदार आहेत. मतदारयादीतून सुमारे १४ लाखाहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आणि सुमारे तीन लाख ८५ हजार मतदारांची नव्याने नोंदणी करण्यात आली. त्यामुळे मतदारांची संख्या आधीच्या तुलनेत यावेळी १० लाखाने कमी झाली. गेल्या निवडणुकीत ४४.७५ टक्के इतके मतदान झाले होते, म्हणजे सुमारे ४५ लाख ६४ हजार मतदारांनी मतदान केले. तर यावेळी सुमारे ५५ टक्के इतके मतदान झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून रात्री उशिरा सांगण्यात आले. त्यानुसार सुमारे ५० लाख ६० हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व ही संख्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सुमारे साडेचार लाखांनी अधिक आहे. मतदानाच्या टक्केवारीत १० टक्क्यांची घसघशीत वाढ दिसत असली तरी मतदारांच्या संख्येच्या आकडय़ानुसार ती तुलनेने कमी आहे. मात्र सन २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मुंबईतील मतदारांमध्ये जागरुकता वाढल्याने मतदानाची टक्केवारी ५३ ते ५५ टक्क्य़ांपर्यंत गेली होती. तोच कलही महापालिका निवडणुकीनिमित्ताने उसळलेल्या प्रचारकल्लोळामुळे दिसून आला आहे व याही वेळी मतदान वाढले आहे.

हा घोळ नाही : सहारिया

मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदान करता आले नसल्याच्या एक दोनच घटना घडल्या असून, राज्यात यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे मतदार यांद्यामध्ये घोळ झाला असे म्हणता येणार नाही, अशी भूमिका राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी मांडली. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे किंवा त्यातून वगळण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास नसून तो केंद्रीय निवडणूक आयोगास आहे. मतदार याद्या दुरूस्तीची प्रक्रिया निरंतर असून ही यादी संकेत स्थळावरही उपलब्ध असते. या निवडणुकीसाठी ५ जानेवारी २०१७ची यादी अंतिम धरण्यात आली होती. त्यापूर्वी १६ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबरदरम्यान या यादीत दुरूस्तीची मुदत देण्यात आली होती. त्यावेळी ज्यांनी नावे दिली त्यांची नावे यादीत आली आहेत, असे आयोगाचे सचिव शेखर चन्न्ो यांनी सांगितले.

मतदान वधारले..

  • ५६% महा-पालिक
  • ६८% जिल्हा परिषद

chart

घोळ कशामुळे?

  • केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी महसूल खात्यामार्फत तयार करण्यात आलेली मतदारयादी राज्य निवडणूक आयोगाने बहुतांश स्वीकारली.
  • त्यात सुमारे १० लाखाहून अधिक मतदारांची नावे आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत कायदेशीर प्रक्रिया करुन वगळण्यात आली होती.
  • महापालिकेने प्रारूप मतदारयादी ऑक्टोबर २०१५ मध्ये प्रसिद्ध करुन सूचना-हरकती मागविल्या होत्या आणि जानेवारीत अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.
  • ही यादी महापालिकेने स्वीकारली, तरी ज्या पद्धतीने लोकसभा व विधानसभेसाठी बूथक्रमांक असतात, त्यात बदल करण्यात आल्याने अनेकांना दुसऱ्या केंद्रांमध्ये जाऊन मतदारयाद्यांमध्ये नावे शोधावी लागली किंवा ती सापडलीच नाहीत, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

पारंपारिक मतदारांचा पाठपुरावा

शिवसेना व भाजप यांच्यात अटीतटीची लढत असल्याने या पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपल्या पारंपारिक मतदारांना घरोघरी जाऊन व निरोप पाठवून मतदानासाठी आणले आणि मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजप आमदार-खासदार हे आपापल्या बालेकिल्ल्यांमधील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न करताना दिसत होते. सप, तसेच एमआयएमच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मुस्लिमबहुल पट्टय़ांमध्ये चांगले मतदान झाल्याचे दिसून आले.

गुजराती मतदान घटले?

भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा गुजराती मतदारांनी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदान कमी केल्याचा अंदाज आहे. बोरिवली, मालाड, विलेपार्ले, मुलुंड परिसरात गुजराती भाषकांचे मतदान सकाळी चांगले झाले. पण दक्षिण मुंबईत या तुलनेत कमी मतदान झाले. याचा फटका भाजपला बसू शकतो, असे बोलले जाते.