मुंबई महापालिका निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सुमारे ३६७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २२७ जागांसाठी २२६७ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेतील बंडखोरी शमविण्यात सेनेच्या नेतेमंडळींना अपयश आल्याने ५ प्रभागांमध्ये बंडखोरांचे आव्हान असणार आहे.

२१ फेब्रुवारीला महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी २७७४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. छाननीनंतर यामधील १४० अर्ज बाद झाले होते. त्यामुळे छाननीनंतर २६३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ३६५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. अद्यापदेखील ५ ठिकाणी अजूनही बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. शिवसेनेच्या तुलनेत इतर पक्षात कमी प्रमाणात बंडखोरी आहे.

प्रभाग क्रमांक १९४ येथे शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांच्याविरोधात माजी शाखाप्रमुख महेश सावंत, जोगेश्वरी प्रभाग क्रमांक ७७ मध्ये बाळा नर यांच्या विरोधात ज्ञानेश्वर सावंत, वरळीतून प्रभाग क्रमांक १९३ मध्ये हेमांगी वरळीकर यांच्या विरोधात नवनाथ करंदेकर, घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक १२३ मधून डॉ. भारती बावदाने यांच्या विरोधात स्नेहल मोरे, प्रभाग क्रमांक २०२ मधून श्रद्धा जाधव यांच्या विरोधात मानसी परब या ५ प्रभागांमध्ये शिवसेनेच्या बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. तर भाजपमध्ये सानिका वझे यांच्या विरोधात उल्का विश्वासराव यांनी तर काँग्रेसमध्ये प्रभाग क्रमांक २०० मधून पल्लवी मुणगेकर यांच्या विरोधात सुवर्णा वाघमारे यांची बंडखोरी कायम आहे.