उद्धव ठाकरे यांना भाजपच्या माधव भांडारी यांचा सवाल
मुंबईतील खड्डय़ांमुळे गेल्या १५-२० वर्षांत अनेक नागरिक दगावले, जायबंदी झाले, अगदी न्यायमूर्तीनाही त्रास झाला, तेव्हा कुठे गेली होती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सहृदयता, असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे. नोटाबंदीनंतर केवळ १५ दिवस बँका व एटीएमच्या रांगामध्ये लोकांना त्रास झाला असेल, पण खराब रस्त्यांचा त्रास मुंबईकर अनेक वर्षे भोगत आहेत. मुख्यमंत्र्यांना पाषाणहृदयी म्हणणाऱ्या ठाकरे यांच्या हृदयाला सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या खड्डय़ांच्या त्रासामुळे वेदना होत नाहीत का, अशी खरमरीत विचारणा त्यांनी केली आहे.
नोटाबंदीनंतर बँका व एटीएमपुढे उसळलेल्या गर्दीत देशभरात २००हून अधिक जणांचा मृत्यू झाला. जनतेला त्रास झाला. मुख्यमंत्री पाषाणहृदयी आहेत, पण या लोकांचा त्रास पाहून मी नोटाबंदीला विरोध केला, असे टीकास्त्र ठाकरे यांनी सोडले होते. त्याला भांडारी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शांघाय व मुंबई यांच्यात सामंजस्य करार झाला असून कचरा व सांडपाणी प्रक्रियेसाठी मदत करण्याची त्यांची तयारी आहे. शांघायमध्ये त्यामुळे अतिशय स्वच्छता असून पाच मेगावॉट वीजनिर्मितीही त्यातून केली जाते. मात्र मुंबई महापालिकेकडून गेली अडीच वर्षे त्यांना प्रतिसाद का दिला जात नाही, असा सवाल केला.
वैद्यकीय उपचारांना मदत
मुख्यमंत्र्यांची महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत दिवसरात्र धावपळ सुरू आहे. पण पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रुग्णालयात मधुरा बेडेकर ही चिमुरडी गंभीर आजारी असून तिच्यावर उपचारांसाठी १२ लाख ५० हजार रुपयांची गरज असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली. त्यावर त्यांना तात्काळ मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून या मुलीच्या उपचारांसाठी आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री हे किती सहृदय आहेत, हे लक्षात घ्यावे, असे भाजपमधील सूत्रांनी स्पष्ट केले.