‘मकर संक्रांत’ अशुभ असल्याचा आजही समज आहे. याला राजकीय पक्षही अपवाद नाहीत. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये होणाऱ्या युतीच्या चर्चेवरही ‘संक्रांती’चे सावट आहे. मकर संक्रांत होईपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही, अशी भूमिका दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईसह राज्यभर थंडीचा कडाका असला तरी, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमुळे राजकीय वातावरण मात्र, चांगलेच तापले आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाल्याने पक्षाच्या नेत्यांचा उत्साह दुपटीने वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रच जिंकायचा, असा चंग नेत्यांनी बांधला आहे. दुसरीकडे शिवसेनेने मुंबईवर भगवा फडकावयचाच, असा निर्धार केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये युतीबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. युतीची चर्चा सुरू होईल, असे वाटत असतानाच, आता ही चर्चा पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. मकर संक्रांत अशुभ असल्याचा समज आहे. त्यामुळे मकर संक्रांत होईपर्यंत चर्चा होणार नाही, अशी भूमिका दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे तूर्तास तरी ही चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, १५ जानेवारीनंतर शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये युतीच्या चर्चेला सुरूवात होईल, असे सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी ठाणे आणि पुण्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्यास तेथील स्थानिक नेत्यांनी प्रचंड विरोध केला आहे. तर नागपूरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत युती करण्यास विरोध केला आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांचा युती करण्यास विरोध असला तरी, वरिष्ठ पातळीवरून दोन्ही नेतेही युती करण्यास अनुकूल आहेत, असे संकेत मिळत आहेत. ठाण्यातील नेत्यांनी शहरात जागोजागी फलक लावून युती नको असे स्पष्टपणे जाहीर केले होते. तर ठाण्यात काल, गुरुवारी भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांनी स्वबळाचाही नारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर युतीबाबतचा निर्णय स्थानिक पदाधिकारीच घेतील, असा सावध पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्यानंतर युतीबाबतच्या चर्चेसाठी भाजपकडून तीन तर शिवसेनेकडून तीन नेते जातील, असे सांगितले जात होते. युतीचा निर्णय जागावाटपावर अवलंबून असेल, अशी चर्चा सुरू असतानाच, मकर संक्रांतीमुळे ही चर्चा दोन दिवस लांबणीवर गेली आहे. आता मकर संक्रांतीनंतरच पुन्हा चर्चेला सुरुवात होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

 

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc election 2017 shivsena bjp yuti discussion postponed due to makar sankranti
First published on: 13-01-2017 at 16:34 IST