शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली संपत्ती जाहीर करावी, असे खुले आव्हान भाजप खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी दिले आहे.  सात बोगस (शेल) कंपन्यांची नावेही सोमय्या यांनी जाहीर केली असून या कंपन्यांमार्फत ठाकरे यांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत का, असा सवालही सोमय्या यांनी केला आहे. ठाकरे यांच्या संपत्तीवरच भाजपने हल्ला चढविल्याने आता उभयपक्षी लढत आणखी तीव्र होणार आहे.

सोमय्या यांनी स्वत:ची मालमत्ता वेबसाइटवर जाहीर केली असून १९९५ ते २०१४ पर्यंतचे सर्व आर्थिक व्यवहार त्यावर टाकले आहेत. आता ठाकरे यांनी आपली संपत्ती जाहीर करून माझे आव्हान स्वीकारावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जगमंद्री फिनवेस्ट लि., किम इलेक्ट्रॉनिक्स लि, जेपीके (इंडिया) ट्रेडिंग प्रा.लि. या बोगस कंपन्यांमध्ये ठाकरे यांची गुंतवणूक आहे का, असा सवाल सोमय्या यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी रिगलगोल्ड ट्रेडिंग आणि व्हॅनगार्ड ज्वेल्स लि. या कंपन्यांद्वारे रक्कम फिरविली. त्यांच्याशी ठाकरे यांचेही लागेबांधे आहेत का, याचाही खुलासा ठाकरे यांनी करावा, असे सोमय्या यांनी म्हटले आहे. लेक्सस इन्फोटेक लि. आणि यश व्ही ज्वेल्स लि. या कंपन्यांमध्येही ठाकरे यांची गुंतवणूक आहे का, अशी विचारणा सोमय्या यांनी केली असून या कंपन्यांवर सेबीने बंदी घातली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बोगस कंपन्यांविरुद्ध पंतप्रधानांच्या आदेशावरून सुरू झालेल्या मोहिमेमुळेच ठाकरे संतापले आहेत, असा चिमटाही सोमय्या यांनी काढला.

  • सात बोगस (शेल) कंपन्यांची नावेही सोमय्या यांनी जाहीर केली असून या कंपन्यांमार्फत ठाकरे यांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत का, असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.