उमेदवारामागे फिरण्यासाठी दररोज ३०० रुपये मानधन; दोन वेळच्या जेवणाचीही सोय
प्रचारयात्रांमुळे उमेदवाराला मतदानात किती फायदा होतो ते माहिती नाही पण समाजातील दुर्लक्षित घटकांना मात्र प्रचारयात्रांचे दिवस फलदायी ठरत आहेत. सकाळी आणि रात्री प्रचारसभांमधून कार्यकर्ता होऊन फिरण्यासाठी ३०० रुपये मानधन सध्या मिळत असून सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवणही सुटत असल्याने अनेक बेरोजगारांसाठी सुगीचे दिवस आले आहेत.
[jwplayer 5wCSijMb]
प्रचाराची रणधुमाळी आणि त्यावर होणारा कोटय़वधी रुपयांचा खर्च यांचा हिशोब घालण्यात सध्या पक्षधुरिण आणि निवडणूक अधिकारी व्यग्र असले तरी या पैशाच्या उलाढालीने बाजारात आनंदाचे वातावरण आहे. महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार हा मुख्यत्वे दारोदार फिरून केला जातो. पाच वर्षांत मतदारांशी कोणतीही ओळख नसली तरी हात जोडून फिरताना मागे कार्यकर्त्यांची फौज दिसणे गरजेचे असते. आयत्या वेळी कार्यकर्ते उभे करणे शक्य नसल्याने आणि खिशाला चाट देऊन पंधरा दिवस वेळ देणे कोणालाही शक्य नसल्याने मग रोजंदारीवरील कार्यकर्त्यांचा मार्ग सोयीचा पडतो. पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दोन हजारांहून अधिक उमेदवारांपैकी बहुतेकांनी रोजंदारीवरील कार्यकर्ते घेऊन फिरण्याचा मार्ग निवडला आहे. त्यामुळे दहिसरच्या गणपतनगरपासून कुलाब्याच्या गरीब वस्तीपर्यंत कार्यकर्ते पुरवणाऱ्यांचेही खिसे गरम झाले आहेत.
सध्या प्रतिकार्यकर्ता पाचशे रुपये मानधन पक्षाकडून मिळते. त्यातील दोनशे रुपये कमिशन आणि तीनशे रुपये प्रत्यक्ष कार्यकर्त्यांला दिले जातात. अनेक पक्षांकडून एकाच व्यक्तीला ‘कार्यकर्त्यां’ची ‘ऑर्डर’ देण्यात येते. त्यामुळे काही वेळा एक ‘कार्यकर्ता’ वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रचारयात्रांमध्येही दिसतो, असे वांद्रे येथील युवा या समाजसेवी संस्थेत काम करणाऱ्या लक्ष्मी पंडित म्हणाल्या.
‘मी इतर काम करत नाही. निवडणुकीच्या वेळी जसे काम येईल तसे बाहेर पडते. एका पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारयात्रेला काल गेले होते, तिथे तीनशे रुपये मिळाले. संध्याकाळी तीन ते संध्याकाळी साडेसात-आठ वाजेपर्यंत काम असते. उद्यापण काम आहे. पण कोणता उमेदवार आहे ते काही कळलेले नाही,’ असे इंदिरा नगरमधील आयेशा शेख यांनी सांगितले. उमेदवाराकडून चारशे रुपये मिळतात असे दीदी म्हणत होती, पण कळले की पाचशे दिले जातात, आम्हाला मात्र गेल्या दोन निवडणुकांमध्येही तीनशेच रुपये मिळाले होते, पण काहीच न मिळण्यापेक्षा दहा दिवसांत तीन हजार मिळणे काही वाईट नाही, असेही आणखी एकीने सांगितले.
भाषेची अडचण
खेरवाडी येथे एका पक्षाच्या मराठी उमेदवारासाठी भारतनगरमधून कार्यकर्ते नेण्यात आले होते. कार्यकर्त्यांमध्ये मराठी, हिंदी भाषिक व मुस्लीम कामगारांचा समावेश होता. मात्र प्रचारयात्रेसाठी ठरवण्यात आलेला परिसर तेलगु भाषकांचा होता. उमेदवार व कार्यकर्ते या दोघांनाही तेलगु भाषा येत नसल्याने प्रचारयात्रेचा फज्जा उडाला.
पुरुषांपेक्षा महिला कार्यकर्त्यां अधिक
राजकारणात महिलांची संख्या वाढावी यासाठी एकीकडे आरक्षणाचा मार्ग अवलंबला गेला असला तरी प्रत्यक्षात रोजंदारीवर येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. स्त्रिया कार्यकर्त्यां मिळवणे सोपे असल्याने काही वेळा पुरुष उमेदवारांच्या मागे महिला कार्यर्त्यांचीच फौज दिसते, असे निरीक्षण स्नेहा सागर संस्थेतील नुरी शेख यांनी नोंदवले.
[jwplayer k4dUpC7B]
