रणधुमाळी : उत्तर मध्य मुंबई
पश्चिमेला उच्चभ्रू वर्ग, विलेपार्ले, सांताक्रूझ, खार पूर्वेचा मध्यमवर्गीय आणि चांदिवली, कुर्ला येथील झोपडपट्टी यांनी तयार झालेल्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात या वेळी शिवसेना स्वत:च्या किती जागा राखते आणि ओवेसीच्या एमआयएमचा सप आणि काँग्रेसला किती फरक पडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
या मतदारसंघातील काही ठिकाणी फक्त तीन उमेदवारांमध्ये लढत आहे, तर दुसरीकडे एका जागेकरिता तब्बल ३१ उमेदवार रिंगणात आहेत. वांद्रे पश्चिमेकडील उच्चभ्रू वस्ती वर्षांनुवर्षे काँग्रेसच्या बाजूने राहिली आहे. आशीष शेलार यांच्यामुळे तिथे भाजपनेही शिरकाव केला आहे. सांताक्रूझ व खार येथील मध्यमवर्गीय मराठी मते नेमकी कोणाला जातात ते पाहावे लागेल. या ठिकाणी मनसेने दोन जागा जिंकल्या होत्या. मात्र मनसेचा सध्याचा प्रवास पाहता यंदा त्या राखणे कठीण आहे. या जागा स्वत:कडे ओढण्यासाठी भाजप व सेना यांच्यात चुरस आहे. वांद्रे पूर्वेकडे सेनेचा गड आहे. त्यामुळे सेना या विभागापुरती निवांत आहे. या वेळी सेनेने मुस्लीम उमेदवार दिल्याने पहिल्यांदाच मुस्लीमबहुल भागात सेनेच्या नावाची चर्चा सुरू झाली असली तरीही येथे काँग्रेस, सप व एमआयएम यांच्यातच लढत राहील. विधानसभा निवडणुकीवेळी एमआयएमने या भागात मतांची चांगली बेगमी केली होती.
चांदिवली व कुर्ला येथील निवडणुकीतील मुद्दे शहराच्या इतर भागांतील समस्यांपेक्षा १८० अंशाच्या कोनात वळतात. अतिक्रमणे व अनधिकृत बांधकाम ही येथील समस्या नाही तर या अनधिकृतपणे बांधलेल्या हजारो घरांना पाणी, आरोग्य अशा मूलभूत सुविधा नियमितपणे देण्याच्या मुद्दय़ांवर निवडणुका लढवल्या जातात. कनिष्ठवर्गीय व मुस्लीमबहुल असलेल्या या भागातील विद्यमान १५ नगरसेवकांपैकी शिवसेनेकडे पाच, सप, मनसे व राष्ट्रवादीकडे प्रत्येकी दोन, भाजपचा एक तर तीन अपक्ष आहेत. यातील एक अपक्ष सेनेकडे तर दुसरा भाजपकडे गेला आहे. विद्यमान नगरसेवकांपैकी नऊ जण या प्रभागात पुन्हा निवडणुकीत उतरले आहेत. मनसे व राष्ट्रवादीचा जोर यंदा दिसत नसला तरी या वेळी एमआयएमचे नवीन आव्हान या भागातही असेल. गेल्या वेळी सप व राष्ट्रवादीमुळे काँग्रेसला या भागात खातेही उघडता आले नव्हते.
चुरशीच्या लढती
कुर्ला येथील प्रभाग क्रमांक १६८ मधून शिवसेनेच्या नगरसेविका आणि स्थायी व आरोग्य समितीच्या सदस्य डॉ. अनुराधा पेडणेकर निवडणुकीत उतरल्या आहेत. याच ठिकाणी राष्ट्रवादीकडून डॉ. सईदा खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. डॉ. खान यांनीही आरोग्य समितीत काम केले आहे. या दोन अभ्यासू आणि तुल्यबळ नगरसेविकांमधील लढत चुरशीची ठरेल. सांताक्रूझमधून गेल्या वेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर विजयी झाल्या होत्या. या वेळी विभाग पुनर्रचनेत शेजारच्या वॉर्डच्या परिसराची सरमिसळ झाल्याने या प्रभागातून आता सेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांना भाजपचे विद्यमान नगरसेवक महेश पारकर लढत देत आहेत. मतदारसंख्येच्या बदललेल्या गणितामुळे ही निवडणूक उत्कंठावर्धक होईल.
केवळ तीन आणि सर्वाधिक उमेदवार
वांद्रे येथील प्रभाग क्रमांक १०० आणि टिळकनगर येथील १५८ या प्रभागांमध्ये प्रत्येकी केवळ तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. शिवसेना, भाजप, काँग्रेस या तीन पक्षांत थेट लढती होतील. याच भागात कुर्ला येथील १६४ क्रमांकाच्या प्रभागातून सर्वाधिक ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याच प्रभागाच्या बाजूला असलेल्या १६० प्रभागातून १८ तर १६५ मधून १६ उमेदवार लढत देत आहेत.
या विभागातील प्रश्न
* रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले नाइट क्लब, वाहनांची वर्दळ व हॉर्नचे आवाज यांचा रहिवाशांना त्रास
* सांताक्रूझ, खारमधील संरक्षण दलाच्या जमिनीवरील झोपडय़ांच्या पुनर्विकासाचा पेच.
* वांद्रे पूर्व तसेच कुर्ला परिसरात अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांची समस्या जटिल
* कुर्ला येथील भाभा रुग्णालयाची दुरवस्था व आरोग्य सुविधांचा अभाव
* कुर्ला, पवई, चांदिवली येथील डोंगराळ भागातील वस्त्यांच्या दरडीपासून संरक्षणाचा मुद्दा.
* लोकसभा – भाजप
* विधानसभा – सहापैकी तीन ठिकाणी सेना, दोन ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी काँग्रेसचा विजय.
* पालिका – ३६ पैकी सेना १०, काँग्रेस ८, मनसे ६, भाजप ३, सप २, राष्ट्रवादी २ तर अपक्ष ५ ठिकाणी विजयी. विलेपार्ले येथील ज्योती अळवणी व कुर्ला येथील लीना शुक्ला आता भाजपकडून तर राष्ट्रवादीच्या सविता पवार प्रभाग १५६ मध्ये सेनेकडून निवडणूक लढवत आहेत. अपक्ष म्हणून जिंकून आलेल्या विजय तांडेल यांच्या कुटुंबातून सान्वी तांडेल सेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक १७१ मध्ये उभ्या आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी १६ जण पुन्हा लढतीत उतरले आहेत.