दोघांचेही एक पाऊल मागे; ताकदीनुसार तडजोड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगरपालिका निवडणुकांचा कौल लक्षात घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असला तरी ही आघाडी सोयीची होणार आहे. म्हणजेच राष्ट्रवादीला पुणे वा पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसशी संगत नको आहे, तर काँग्रेसला विदर्भात राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायची नाही. जेथे शक्य होईल अशा ठिकाणी आघाडी करण्याचे दोन्ही पक्षांचे धोरण आहे.

दोन्ही काँग्रेसने एकत्र लढावे, अशी सूचना राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी करताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्याला अनुकूलता दर्शविली. राष्ट्रवादीने आघाडी करण्याची तयारी आधीच दर्शविली असली तरी काँग्रेसमध्ये मात्र वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत राज्यातील नेत्यांची सोमवारी बैठक पार पडली. या वेळी आघाडीबाबत चर्चा करण्यात आली. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीबरोबर आघाडीचा निर्णय झाल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर केले. यानुसार नाशिक आणि अमरावती पदवीधर व नागपूर शिक्षक या तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेस लढणार आहे. औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादी तर कोकण शिक्षकची जागा शेकापला सोडण्यात येणार आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये स्थानिक पातळीवर आघाडीचा निर्णय सोपविण्यात आला आहे. स्थानिक नेत्यांची तयारी असेल तरच आघाडी होईल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदांमध्येही जेथे भाजप किंवा शिवसेनेची ताकद आहे त्या जिल्ह्य़ांमध्ये दोन्ही काँग्रेसचे सूर जुळू शकतात. ‘शत प्रतिशत’ आघाडी होणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका नेत्याने व्यक्त केली. विदर्भात राष्ट्रवादीची फार काही ताकद नाही तेथे आघाडीस काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. सांगलीत जयंत पाटील आघाडीस तयार असले तरी काँग्रेसचे डॉ. पतंगराव कदम हे फारसे अनुकूल नाहीत. प्रत्येक जिल्ह्य़ातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. आघाडीस दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे एकमत झाले तरीही जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरेल. हे सारे मुद्दे लक्षात घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सोयीचीच आघाडी होईल, अशी लक्षणे आहेत.

राष्ट्रवादीशी आघाडी करताना सावधता बाळगा, असे मत काँग्रेसच्या बैठकीत व्यक्त  करण्यात आले.

कुठे आघाडी होऊ शकते?

  • ठाणे महानगरपालिकेत आघाडी व्हावी, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मांडली आहे. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे एकत्र लढण्यास अनुकूल आहेत.
  • नाशिक, अमरावती, अकोला या महानगरपालिकांमध्ये आघाडीबाबत एकमत होऊ शकते. सोलापूरमध्येही चाचपणी केली जात आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थितीत आघाडी केली जाणार नाही, अशी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची भूमिका आहे.
  • पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला फार काही महत्त्व देण्यास तयार नाही. काँग्रेसची जास्त जागांची मागणी मान्य होऊ शकत नाही. परिणामी आघाडीची शक्यता नाही. नागपूरमध्ये दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधील रुसवे-फुगवे लक्षात घेता जुळवून घेणे कठीणच आहे.
मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp alliance issue in corporation election
First published on: 17-01-2017 at 02:34 IST