पक्षाच्या यादीत १०० मराठी उमेदवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गटबाजीने पोखरलेल्या मुंबई काँग्रेसची यादी अखेर जाहीर करण्यात आली असून, जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली. १०० पेक्षा जास्त मराठी चेहऱ्यांना उमेदवारी देत मराठी मते काँग्रेसपासून दूर जाणार नाहीत याची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच सत्तेत आल्यास महापालिकेच्या वतीने २० रुपयांमध्ये पोटभर थाळी, हे आश्वासन काँग्रेसच्या वतीने मतदारांना देण्यात आले आहे.

संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्यातील वादाने मुंबई काँग्रेसमधील संघर्ष टोकाला गेला होता. निरुपम यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि प्रचारापासून दूर राहण्याचा इशारा कामत यांनी दिला होता. मात्र, कामत समर्थकांना उमेदवारी देत त्यांचा राग कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत १०० मराठी चेहऱ्यांना संधी देण्यात आली. मुस्लीम (३९), उत्तर भारतीय (३५), गुजराती (२२), ख्रिश्चन (११), पंजाबी (५) अशा सर्व जाती-धर्मीयांना सामावून घेण्यात आले आहे. मराठीबरोबरच सर्व समुदायांना संधी देण्यात आल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितले. निवडून येण्याची क्षमता या एकाच निकषांवर उमेदवारीचे वाटप करण्यात आले आहे.

ज्येष्ठांना संधी

काँग्रेसने रवी राजा, उपेंद्र दोशी, बी. के. तिवारी या जुन्याजाणत्या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पक्षाचे ११० पेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला आहे. काही नाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत म्हणजे सोमवापर्यंत बंडखोरांची नाराजी दूर करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

स्वस्तात पोटभर थाळी!

सत्तेत आल्यास महानगरपालिकेच्या वतीने २० रुपयांमध्ये थाळी, असे आश्वासन काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. पक्षाच्या प्रचाराला मालवणी येथे रविवारी होणाऱ्या जाहीर सभेने सुरुवात होणार आहे. या वेळी पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात येईल. मुंबईकरांना स्वस्तात पोटभर जेवण, हे काँग्रेसचे आश्वासन असून, सत्तेत आल्यावर लगेचच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही निरुपम यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party in bmc election
First published on: 04-02-2017 at 02:12 IST