शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडल्याची घोषणा केल्यानंतर झालेल्या भाजपच्या पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले आहे. शिवसेनेला कौरवांची उपमा देत आता धर्मयुद्ध होऊनच जाऊ द्या, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रचाराचे रणशिंग फुंकले. मुंबईतील गोरेगावच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना महाभारतातील दाखले देत मुख्यमंत्र्यांना शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘दुर्योधनाच्या बाजूला अनेक शकुनी मामा आहेत. भाजपची औकात काय, असे ते म्हणतात. २१ फेब्रुवारीला भाजपची काय औकात आहे, ते दाखवून देऊ,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधले.

‘पारदर्शकतेच्या मुद्यावर युती व्हावी, असा माझा आग्रह होता. मात्र पारदर्शकतेचा आग्रह धरणे, ही माझी चूक होती. तुमच्या विचारांशी आमची फारकत नाही. तुमच्या आचाराशी आमची फारकत आहे. भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे,’ असे म्हणत भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ‘दुर्योधनाच्या आजूबाजूला शकुनी मामांची गर्दी आहे. भाजपची औकात ६० जागांची आहे, असे हे शकुनी मामा म्हणत आहेत. मात्र भाजपची औकात काय आहे, हे २१ फेब्रुवारीला समजेल. तुमची औकात काय आहे ?,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे.

‘विधानसभा निवडणुकीत आम्ही शिवसेनेला १४७ जागा द्यायला तयार होतो. लोकसभा निवडणुकीत आमची ताकद वाढली असतानाही आम्ही कमीपणा घेतला होता. मात्र मिशन १५१ची घोषणा करण्यात आली. १५१ जागांचा हट्ट धरण्यात आला आणि त्यामुळे युती तुटली,’ असे म्हणत विधानसभेवेळी युती तुटण्याला शिवसेनाच जबाबदार असल्याचे म्हटले. ‘युती तुटल्यामुळेच आम्हाला आमची ताकद समजली. युती तुटल्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो,’ असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना म्हटले.

भाजपसोबत केल्याने आमची २५ वर्षे सडली, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टिकेलादेखील मुख्यमंत्र्यांनी सभेत बोलताना उत्तर दिले. ‘कोणासोबतही फरफटत जाऊ नका, हा धडा आम्हाला २५ वर्षांच्या युतीने दिला. २५ वर्षे आमच्यामुळे मुंबईत तुमचा महापौर झाला. जनतेचा कौल पारदर्शी कारभाराला आहे. जे सोबत येतील त्यांच्यासोबत किंवा त्यांच्याशिवाय परिवर्तन अटळ आहे,’ असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.