* सेना, भाजपमध्ये आयारामांमुळे अस्वस्थता * अन्य पक्षांत गयारामांमुळे चिंता

महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना पक्षबदलाला वेग आला असून मंगळवारी एकाच दिवसात सेनेतून मनसेत, मनसेतून सेनेत व राष्ट्रवादीतून भाजपत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. उमेदवारी अथवा राजकीय फायद्यासाठी इतर पक्षांत उडय़ा मारण्याच्या या कार्यक्रमाला येते काही दिवस आणखी जोर चढण्याची चिन्हे आहेत. मात्र, एकीकडे शिवसेना तसेच भाजपमध्ये दाखल होत असलेल्या ‘इच्छुकां’मुळे पक्षांतील जुने दावेदार अस्वस्थ आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने या पक्षांतही चिंतेचे वातावरण आहे.

मनसेचा गड भक्कमपणे सांभाळणारे बोरिवलीतील नगरसेवक चेतन कदम यांनी मंगळवारी सेनेत प्रवेश केला. आधीच डळमळीत झालेल्या मनसेला हा जोरदार धक्का आहे. त्याच वेळी शिवसेनेतील मालाडचे नगरसेवक विश्वास घाडीगावकर यांनी उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर असल्याने मनसेचा रस्ता धरला, अशी चर्चा होती. कुलाब्यातून निवडून आलेले मकरंद नार्वेकरच्या पत्नी हर्षदा नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ३ फेब्रुवारीपर्यंतच आहे. शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी बंडखोरीच्या भीतीने उमेदवार यादींबाबत प्रचंड गुप्तता पाळली असली तरी उमेदवारी जाहीर झाल्यावरही अखेरच्या दिवशी दलबदलाची शक्यता नाकारता येत नाही.

पालिका निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर डिसेंबरमध्येच कार्यकर्त्यांच्या पक्षबदलाला सुरुवात झाली होती. मनसेचे बुडते जहाज आणि ते वाचवण्यासाठी होत नसलेले प्रयत्न पाहून अनेकांनी मोठय़ा भावाकडे धाव घेतली. यात पहिली उडी मनसेचे दादर शाखेचे अध्यक्ष प्रकाश पाटणकर यांनी मारली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका संध्या दोषी यांनीही लगोलग सेनेचा रस्ता धरला. मालाडमधील नगरसेवक भोमसिंग राठोड व पालिकेत विरोधी पक्षनेता राहिलेले देवेंद्र आंबेरकर यांनीही काँग्रेसमधील बजबजपुरीला कंटाळून सेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. मनसेचे सरचिटणीस संजय घाडी यांनी त्याआधीच सेनेचा भगवा आपलासा केला. याशिवाय आणखीही काही पदाधिकारी सेनेमध्ये येत असल्याची चर्चा सुरू आहे.

सेनेमध्ये नाराज असलेल्या माजी पदाधिकाऱ्यांना भाजपने स्वत:जवळ ओढण्यास सुरुवात केली. शिवसेनेच्या वतीने बेस्ट समितीवर सदस्य असलेल्या सुनील गणाचार्य आणि चार वेळा आमदार राहिलेले सुरेश गंभीर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून या दलबदलाची सुरुवात केली. सुरेश गंभीर यांच्या मुलीला दादरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. माजी महापौर हरेश्वर पाटील हेदेखील भाजपमध्ये दाखल झाले असून त्यांच्या सुनेला नगरसेवकपदासाठी उभे केले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय कामगार सेनेचे माजी सरचिटणीस मिलिंद तुळसकर, मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे, काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे, माजी नगरसेवक रमेश नाईक अशा माजी पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या निमित्ताने भाजपप्रवेश केला. त्याचसोबत चांदिवली येथील सेनेच्या लीना शुक्ला, जोगेश्वरीमधील मनसेचे भालचंद्र आंबोरे व मालाड येथील काँग्रेसचे परविंदसिंग भामरा या नगरसेवकांनाही भाजपने आपले म्हटले आहे.