शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना भाजपमधील संघर्ष पेटला आहे. भाजपच्या नगरसेविका आणि पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे यांच्याविरोधात घाटकोपर वॉर्डाच्या शाखाप्रमुखांनी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे.

रितू तावडे यांनी घाटकोपरच्या वॉर्ड क्र. १२७ मध्ये हळदी कुंकू कार्यक्रमात सोन्याची नथ, साडी आणि भांडी देऊन आचारसंहितेचा भंग केला आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे. शाखाप्रमुख संजय कदम यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. महापालिका निवडणुकीतील आचारसंहिता नियमांचा तावडे यांनी भंग केला आहे. तावडे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्न केल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. रितू तावडे यांनी २१ जानेवारीपासून विभागात हळदीकुंकू समारंभातंर्गत सोन्याची नथ, साडी , विविध भांडी देण्यास सुरु केले आहे. या कार्यक्रमात तावडे यांची आणि त्यांच्या सहका-यांची उपस्थिती असते आणि कार्यक्रमांना आचारसंहितातंर्गत कोणत्याही प्रकारची परवानगी घेत नाहीत असा आरोप कदम यांनी केला आहे. त्यामुळे तावडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करुन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी कदम यांनी केली आहे.