केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प घोर निराशा करणारा असल्याची टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अधिक धाडसी आणि ठोस तरतुदी असायला पाहिजे होत्या. प्रत्यक्षात मात्र अर्थसंकल्पाने घोर निराशा केली. प्रत्येकबाबतीतील तूट सरकारच्या नियोजित अंदाजापेक्षा हाताबाहेर गेली. दुसरीकडे निर्यातीला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. याशिवाय, प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रूपयांची आरोग्य मदत हा तर फक्त ‘चुनावी जुमला’ असल्याची टीका पी. चिदंबरम यांनी केली.

२०१७-१८ मध्ये अर्थमंत्र्यांनी वित्तीय तूट ३.२ टक्के इतकी राहील, असे म्हटले होते. मात्र, ही वित्तीय तूट ३.५ टक्क्यांवर गेली. अरूण जेटली यांनी आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्त्पन्न दुप्पट करण्याचा पुनरुच्चार केला. मात्र, पी. चिदंबरम यांनी त्यावरूनही सरकारवर टीका केली. आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या कायम राहणार आहेत, असे जेटलींनी म्हटले. देवाची कृपा म्हणायला हवी की, हा जेटलींचा शेवटचा अर्थसंकल्प आहे, असा टोलाही चिदंबरम यांनी हाणला.

तर माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांनीदेखील सरकारकडून सादर करण्यात आलेल्या वित्तीय तुटीच्या आकडेवारीत नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याची शंका व्यक्त केली. आगामी निवडणुकांमध्ये फायदा मिळवण्याच्यादृष्टीने अर्थसंकल्प सादर करण्यात आला, असा आरोप मी करत नाही. मात्र, अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलेल्या वित्तीय तुटीच्या आकडेवारीत नक्कीच काहीतरी घोळ आहे, असे मनमोहन सिंह यांनी म्हटले.

यावेळी त्यांना आजचा अर्थसंकल्प सुधारणावादी होता का असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर मनमोहन सिंह म्हणाले की, ‘सुधारणा’ या शब्दाचा अनेकदा गैरवापर केला जातो. त्यामुळे मला त्याविषयी भाष्य करायचे नाही. अर्थसंकल्पातील विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे की, कृषी क्षेत्रातील सर्व समस्या संपल्या आहेत का? तसे नसेल तर मग त्या समस्यांशी सामना करण्यासाठी कोणती रणनीती आखण्यात आली आहे?, असा सवालही त्यांनी विचारला.