AI saved Rs 4285 Crore Of Microsoft: मायक्रोसॉफ्ट त्यांच्या कंपनीची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) भर देत आहे. कंपनी त्यांची कामे सुलभ करण्यासाठी, विक्री आणि ग्राहक सेवेमध्ये उत्पादकता वाढविण्यासाठी, पुन्हा पुन्हा करावी लागणारी कामे स्वयंचलित पद्धतीने करण्यासाठी आणि ग्राहकांशी संवाद सुधारण्यासाठी एआय टूल्सचा वापर करत आहे. याचबरोबर मायक्रोसॉफ्ट कंपनी त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांनाही नोकरीवरून काढून टाकत आहे.
दरम्यान, ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, मायक्रोसॉफ्टचे मुख्य व्यावसायिक अधिकारी जडसन अल्थॉफ यांनी अलीकडेच सांगितले की, गेल्या वर्षी केवळ कॉल सेंटर ऑपरेशन्समध्ये एआयने कंपनीची अंदाजे ४,२८५ कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत केली आहे. ग्राहकांच्या समाधानात आणि अंतर्गत कार्यक्षमतेत सुधारणा झाल्यामुळे ही बचत झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
कंपनीच्या सादरीकरणादरम्यान अल्थॉफ यांनी केलेल्या टिप्पण्यांवरून, विक्री आणि ग्राहक सेवेपासून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटपर्यंतच्या कार्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एआयवर कसे पूर्णपणे अवलंबून आहे, हे अधोरेखित होते.
विक्री विभागांना अधिक लीड्स निर्माण करण्यास, डील लवकर पूर्ण करण्यास आणि महसूल ९ टक्क्यांनी वाढवण्यास मदत करण्यासाठी कंपनी त्यांच्या कोपायलट एआय असिस्टंटचा वापर करत असल्याचे वृत्त आहे.
कंपनीने स्पष्ट केले आहे की, एआय आता नवीन उत्पादनांसाठी ३५ टक्के कोड लिहिते. मायक्रोसॉफ्टचे गिटहब कोपायलट टूल, एक एआय-संचालित कोडिंग सोल्यूशन आहे, जे जागतिक स्तरावर १५ दशलक्षहून अधिक युजर्सकडून वापरले जाते.
मायक्रोसॉफ्ट ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी, विशेषतः लहान क्लायंटसोबत, एआयची चाचणी घेत आहे, ज्याद्वारे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे.
पण मायक्रोसॉफ्टमधील या एआय परिवर्तनाची अनेक कर्मचाऱ्यांना किंमत मोजावी लागत आहे. कंपनीतील एआयच्या वाढत्या प्रभावाबाबतचे हे अंतर्गत दावे समोर येण्याच्या काही दिवस आधी, मायक्रोसॉफ्टने सुमारे ९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. अलिकडच्या काही महिन्यांत कंपनीची ही तिसरी मोठी कर्मचारी कपात आहे आणि त्याचा परिणाम कंपनीच्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी जवळजवळ ४ टक्के कर्मचाऱ्यांवर होत आहे.