Anand Mahindra On Skilled Labour Shortage: गेल्या काही काळात वाढलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरामुळे अनेक प्रकारच्या नोकऱ्या कमी होतील, अशी भाकिते व्यक्त केली जात आहेत. अनेक बड्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी याबाबत भीती व्यक्त केली आहे. या भीतीच्या पार्श्वभूमीवर, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी कुशल कामगारांच्या संभाव्य तुटवड्यावर भाष्य केले आहे. आनंद महिंद्रा यांनी आर्थिकदृष्ट्या प्रभावी असलेल्या सर्वच क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित कामगारांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे.
फोर्ड मोटर कंपनीचे सीईओ जिम फार्ले यांच्या विधानाचा दाखला देताना आनंद महिंद्रा यांनी नमूद केले की समाज व्हाईट कॉलर नोकऱ्यांच्या भविष्यावर चर्चा करत असला तरी वास्तव खूपच वेगळे आहे.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा म्हणाले की, “एआय व्हाईट कॉलर नोकऱ्या नष्ट करेल या भीतीबाबत चर्चा करण्यात आपण इतके व्यस्त आहोत की यामुळे आपण एका मोठ्या संकटाकडे दुर्लक्ष करत आहोत. ते संकट म्हणजे कुशल कामगारांचा तुटवडा.”
महिंद्रा यांनी असे निदर्शनास आणून दिले की कामगार तुटवड्याचे मूळ सांस्कृतिक निवडींमध्ये आहे. ते म्हणाले की अनेक दशकांपासून समाजाने पदवी आणि डेस्क नोकऱ्यांना वरचे स्थान दिले आहे, तर जिथे कौशल्य लागते अशा नोकऱ्यांना तळाशी ढकलले आहे. यामुळे एक अशी पिढी निर्माण झाली आहे जी उच्च-मूल्य आणि कौशल्ये लागणाऱ्या व्यवसायांपासून दूर गेली.
पण, मजेशीर गोष्ट अशी आहे की या अशा नोकऱ्या आहेत ज्यांची जागा एआय घेऊ शकत नाही, कारण यासाठी निर्णयक्षमता, कौशल्ये आणि प्रत्यक्ष अनुभव यांची गरज असते.
“समाज ज्याला स्वप्नवत करिअर मानतो, त्यात येत्या काळात आपल्याला मोठा बदल पाहायला मिळणार आहे का?” असा प्रश्नही महिंद्रा यांनी यावेळी विचारला. त्यांनी सुचवले की एआय युगाचे खरे विजेते कोडर किंवा अधिकारी नसून विविध क्षेत्रातील कुशल कामगार असतील.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला व स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनीही कुशल कामगारांच्या तुटवड्यावरील वाढत्या संकटावर आपले मत मांडले आहे. “अमेरिकेत अशा लोकांची मोठी कमतरता आहे जे आव्हानात्मक शारीरिक काम करू शकतात किंवा ज्यांना तसे करण्यासाठी प्रशिक्षण घ्यायची इच्छा आहे”, असे मस्क यांनी १७ नोव्हेंबरला एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
