Anupam Mittal Salary Hike Controversy: शार्क टँक इंडियाचे जज, पीपल ग्रुप आणि शादी डॉट कॉमचे संस्थापक अनुपम मित्तल अनेकदा वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध गोष्टींवर भाष्य करत असतात. अलिकडेच त्यांनी एक्सवर कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या मागणीवर मत मांडले आहे.

या पोस्टमध्ये अनुपम मित्तल यांनी नमूद केले की, लोक अनेकदा त्यांच्या पगारात ३५ टक्के वाढ मागतात आणि ही एक सामान्य पद्धत असल्याचे स्पष्टीकरण देतात. पण अनुपम मित्तल कर्मचाऱ्यांच्या या पगारवाढीच्या मागणीमागील कारणाशी सहमत नाहीत. याबाबत त्यांनी केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अनुपम मित्तल यांची पगारवाढीबद्दल पोस्ट

अनुपम मित्तल यांनी जॉब स्विच करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या “३५ टक्के पगारवाढ” मागणीबद्दल पोस्ट केली आहे. साधारणपणे भारतात जॉब स्विच करताना उमेदवार नव्या कंपनीकडे ३५ टक्के पगारवाढीची मागणी करतात. या पोस्टमध्ये त्यांनी एका उमेदवाराच्या मुलाखतीतील संभाषणाची नक्कल करत लिहिले, “तुम्ही कधी जॉईन होऊ शकता? एका महिन्यात. पगाराची अपेक्षा? ३५ टक्के वाढ? ३५ टक्के का? हे स्टँडर्ड आहे सर.” यानंतर मित्तल यांनी, हे स्टँडर्ड कोणी बनवले असा प्रश्नही उपस्थित केला.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

अनुपम मित्तल यांच्या या पोस्टवर अनेकांनी बऱ्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोक मित्तल यांच्याशी सहमत झाले, तर काहींनी त्यांच्या चिंता व्यक्त केल्या. अनुपम मित्तल यांनी मूळ पोस्टच्या खाली स्पष्ट केले की, “जर एखादा व्यक्ती पात्र असेल तर त्याने २ पट पगारवाढ मागितली पाहिजे, फक्त ३५ टक्के का? शेवटी, मार्केट निर्णय घेते.”

यावर काही युजर्सनी असा युक्तिवाद केला की ३५ टक्के पगारवाढ देखील कमी आहे, तर काहींनी नियुक्ती प्रक्रियेदरम्यान वाटाघाटी करताना पगारवाढीची टक्केवारी निश्चित करण्यावर आणि उमेदवाराच्या कौशल्यांचा विचार न करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

…तर लोक जास्त पगारवाढ का मागू शकत नाहीत?

एका युजरने विचारले, “तुम्ही जास्त इक्विटी मागू शकता तर लोक जास्त पगारवाढ का मागू शकत नाहीत?” यावर अनुपम मित्तल यांनी उत्तर दिले, “ते निश्चितपणे जास्त पगारवाढ मागू शकतात, पण त्यांना किती वाढ द्यायची हे मार्केट ठरवेल ना?”

हे संभाषण इथेच संपले नाही. या युजरने पुढे म्हटले, “नक्कीच. पगारवाढ देणे हे मार्केट, कर्मचाऱ्याचे कौशल्य, बजेट आणि पदाचे महत्त्व यावर अवलंबून असते. पण, जर तुम्ही त्याचे समर्थन करू शकत असाल तर जास्त पगारवाढ मागणे पूर्णपणे ठीक आहे असे मला वाटते. पण, ‘हे स्टँडर्ड कोणी बनवले’ असे म्हणत खिल्ली उडवणे योग्य नाही.”