Apple Lost 5.34 Lakh Crore Market Value After Launching iPhone 17 series: स्मार्टफोन क्षेत्रातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलने काल, ९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बहुप्रतिक्षित ‘अवे-ड्रॉपिंग’ लाँच इव्हेंटमध्ये त्यांच्या नवीन आयफोन्सचे अनावरण केले. याचसोबत कंपनीने नवीन एअरपॉड्स प्रो ३ आणि अ‍ॅपल वॉच ११ देखील सादर केले आहेत. यावेळी कंपनीने आयफोन १७ सिरीजमधील चार मॉडेल्स सादर केले आहेत. यात आयफोन १७, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन १७ एअर यांचा समावेश आहे.

दरम्यान आयफोन १७ सिरीजसह आयफोन एअर, नवीन वॉच मॉडेल्स एअरपॉड्स प्रो ३ लाँच केल्यानंतर काही मनिटांतच अमेरिकन शेअर बाजारात अ‍ॅपलचे बाजारमूल्य ६०.५५ अब्ज डॉलर्स (५.३४ लाख कोटींहून अधिक रपुये) कमी झाले आहे. कंपनीचे शेअर्स सुमारे १.७ टक्के घसरून २३४ डॉलर्सवर आल्यामुळे कंपनीचे बाजारमूल्य ३.५३ ट्रिलियन डॉलर्सवरून सुमारे ३.४६ ट्रिलियन डॉलर्सवर आले. या वर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये ६.५ पेक्षा जास्त घसरण झाली आहे.

दरम्यान कंपनीने यावेळी आयफोन १७ ला ६.३ इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे. अ‍ॅपलने पहिल्यांदाच नॉन-प्रो आयफोनमध्ये प्रो-मोशन तंत्रज्ञान वापरले आहे. याचबरोबर ग्राहकांना पाच रंगाचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

याचबरोब, प्रो मॉडेल्स डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे. याची बॉडी अ‍ॅल्युमिनियमची असणार असून, ज्यामुळे आयफोन १७ प्रोला आतापर्यंतची सर्वात मोठी बॅटरी मिळाली आहे. “आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स सादर करत आहोत, जे आतापर्यंतचे डिझाइन केलेले सर्वोत्तम आयफोन मॉडेल्स आहेत. फोनसाठी हीट-फोर्ज्ड अ‍ॅल्युमिनियम युनिबॉडी वापरली आहे. ज्यामुळे बॅटरीची क्षमता आणि टिकाऊपणा वाढणार आहे”, असे अ‍ॅपलने लाँचवेळी म्हटले आहे.

या कार्यक्रमात कंपनीने अ‍ॅपल वॉच सिरीज ११ ही लाँचे केले. यामध्ये स्लीप ट्रैकिंग, हार्ट रेट, ब्रीदिंगसह आणखी नवीन आरोग्यविषयक वैशिष्ट्ये आहेत. वॉचमध्ये हायपरटेंशन किंवा उच्च रक्तदाब यांचा अंदाज घेण्यासाठी नवीन अल्गोरिदम असणार आहे. तसेच बॅटरी क्षमताही २४ तास चालेल इतकी आहे.