Edelweiss CEO Radhika Gupta Praises Arattai India Alternative Of Whats App: श्रीधर वेम्बू यांच्या झोहो कॉर्पोरेशनने विकसित केलेले इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप अराताई व्हॉट्सअ‍ॅपला जोरदार टक्कर देत आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा मेड इन इंडिया पर्याय असलेले हे अ‍ॅप, प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवरील सोशल नेटवर्किंग श्रेणीत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. झोहोचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर वेम्बू यांनी एक्सवर पोस्ट केले की, अराताईचे युजर्स ३ दिवसांत १०० पट वाढले आहेत. युजर्सच्या वाढत्या संख्येमुळे, अ‍ॅपचा डेटाबेस वाढवण्यासाठी ते कठोर मेहनत घेत आहेत.

परप्लेक्सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद श्रीनिवास यांच्यानंतर, एडलवाईस म्युच्युअल फंडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता यांनीही झोहोच्या श्रीधर वेम्बू यांचे अराताईच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

राधिका गुप्ता म्हणाल्या की, त्यांचा मेड इन इंडिया ब्रँड्सवर खूप विश्वास आहे. एक्सवर केलेल्या अभिनंदनाच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “अराताईच्या लाँचबद्दल श्रीधर वेम्बू यांचे अभिनंदन. मी त्यांच्या अ‍ॅपची युजर असल्याचा आनंद आहे.”

या अ‍ॅपच्या नव्या युजर्सची दैनिक संख्या केवळ तीन दिवसांत ३,००० वरून ३,५०,००० पर्यंत वाढली आहे, जी १०० पट वाढ आहे. झोहोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी खुलासा केला की, अचानक झालेल्या वाढीमुळे डेटाबेसमध्ये वाढ करण्यासाठी आणि तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी कंपनीची पथके अहोरात्र काम करत आहेत.

२०२१ मध्ये झोहोने लाँच केलेले अराताई अ‍ॅप अलिकडेपर्यंत एक प्रायोगिक प्रकल्प मानले जात होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत डेटा गोपनीयतेच्या वाढत्या चिंतेमुळे भारतात बनवलेल्या या अ‍ॅपचा भारतीय युजर्स गांभीर्याने विचार करू लागले आहेत.

भारताचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नागरिकांना स्थानिक डिजिटल प्लॅटफॉर्मला पसंती देण्याचे जाहीर आवाहन केले, तेव्हा या अ‍ॅपच्या युजर्समध्ये मोठी वाढ झाली. त्यांनी शिफारस केलेल्या अ‍ॅप्समध्ये अराताईचा उल्लेख केला होता. याचबरोबर विवेक वाधवा यांच्यासारख्या टेक क्षेत्रातील लोकांनी ते वापरून पाहिले आणि त्याचे कौतुक केले. यामुळे भारतीय युजर्स याकडे आकर्षित होऊ लागले आहेत.

अराताईमध्ये वन-टू-वन आणि ग्रुप चॅट, व्हॉइस नोट्स, मीडिया शेअरिंग, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल, स्टोरीज आणि चॅनल ब्रॉडकास्टिंग यासारखी फिचर्स आहेत. हे डेस्कटॉप आणि अँड्रॉइड टीव्ही सह अनेक उपकरणांवर देखील वापरता येते.