Bajaj Allianz Health Care Cashless Services: असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स इंडियाने सेवा निलंबित करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स आणि केअर हेल्थ इन्शुरन्सच्या लाखो पॉलिसीधारकांसाठी १ सप्टेंबरपासून कॅशलेस हॉस्पिटलायझेशनची सुविधा बंद होणार आहे.

विमा कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था जनरल इन्शुरन्स कौन्सिलने बजाज अलायन्झ आणि केअर हेल्थ इन्शुरन्स विरुद्धच्या कारवाईवर टीका केली असून, ही अचानक आणि एकतर्फी कारवाई असल्याचे म्हटले आहे. ज्यामुळे पॉलिसीधारकांमध्ये गोंधळ आणि चिंता निर्माण झाल्याचेही जनरल इन्शुरन्स कौन्सिलने म्हटले आहे.

निर्यणयाला विरोध

“संवाद आणि तोडगा काढण्याऐवजी, अचानक एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले, ज्यामुळे देशभरातील पॉलिसीधारकांचे हित धोक्यात आले आहे”, असे कौन्सिलने म्हटले आहे. अशा कृतींमुळे आरोग्य विमा व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होण्याचा धोका आहे, असा इशारा दिला.

दर्जेदार वैद्यकीय सेवा रुग्णांच्या आवाक्याबाहेर

आरोग्य विमा नियामक संस्था, IRDAI, देशभरात १०० टक्के कॅशलेस उपचारांसाठी आग्रह धरत असताना, असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स इंडियाने हे पाऊल उचलले आहे. विमा कंपन्यांवर IRDAI द्वारे कडकपणे नियंत्रण ठेवले जाते, परंतु रुग्णालयांचे काम कोणत्याही नियामक देखरेखीशिवाय चालत आहे, ज्यामुळे IRDAI ला त्यांच्या कृतींवर अंकुश ठेवण्यास मर्यादा आहेत. गेल्या तीन वर्षांत, आरोग्यसेवेचे खर्च गगनाला भिडले आहेत, रुग्णालये उपचार शुल्कात सतत वाढ करत आहेत, ज्यामुळे दर्जेदार वैद्यकीय सेवा लाखो रुग्णांच्या आवाक्याबाहेर जात आहे.

गंभीर रुग्णांचे जगणे धोक्यात

जनरल इन्शुरन्स कौन्सिलने म्हटले आहे की, कॅशलेस सेवेत अडथळा आणणाऱ्या कोणतीही कृतीमुळे शेवटी नागरिकांचे नुकसान होते. पत्रकात म्हटले आहे की, “कॅशलेस सेवेतील व्यत्यय केवळ उपचारांवर जास्त आणि आवाक्याबाहेरील खर्चामुळे याचा कुटुंबांवरच थेट परिणाम होत नाही तर ज्यांना त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते अशा गंभीर वैद्यकीय परिस्थितीत असलेल्या रुग्णांचे जगणे देखील धोक्यात आणतो.”

का बंद केली कॅशलेस सुविधा?

विविध उपचार खर्चात सुधारणा न झाल्यामुळे असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स इंडियाने कॅशलेस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. “भारतात वैद्यकीय महागाई दरवर्षी ७-८ टक्क्यांनी वाढत आहे. यामागे कर्मचाऱ्यांचा खर्च, औषधे, उपभोग्य वस्तू, उपयुक्तता आणि ओव्हरहेड खर्च ही कारणे आहेत. रुग्णालये कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत असताना, जुन्या दरांवर उपचार करणे व्यवहार्य नाही, कमी दरांवर तर नाहीच. कॅशलेश सेवा अशा अटींखाली सुरू राहिल्याने रुग्णसेवेशी तडजोड होण्याचा धोका असतो, ज्याला असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स इंडियाने आणि त्याचे सदस्य परवानगी देऊ शकत नाहीत”, असे असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स इंडियाने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Live Updates