scorecardresearch

ब्लू स्टारचे २०२५ पर्यंत घरगुती वातानुकूलन यंत्रांच्या १५ टक्के बाजारपेठेचे लक्ष्य

मुख्यतः द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी शहरातील किमतीबाबत चोखंदळ ग्राहकांमध्ये ब्लू स्टारच्या उत्पादनांना सर्वाधिक मागणी असून, त्यांच्यासाठी २९,९९० रुपये किमतीपासून सुरू

blue star
ब्लू स्टारचे २०२५ पर्यंत घरगुती वातानुकूलन यंत्रांच्या १५ टक्के बाजारपेठेचे लक्ष्य

मुंबईः यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामासाठी ब्लू स्टार लिमिटेडने पहिल्यांदाच ३० हजार रुपये किमतीखालील इन्व्हर्टर स्प्लिट वातानुकूलन यंत्रे बाजारात आणली असून, कंपनी उत्पादन क्षमतेत वाढ, संशोधन व विकासावर भर देऊन नावीन्यपूर्ण उत्पादनांसह, विक्री जाळेही विस्तारण्याचा निरंतर प्रयत्न करीत आहे. परिणामी २०२४-२५ मध्ये म्हणजे दोन वर्षांनंतर घरगुती वापराच्या वातानुकूल यंत्रात १५ टक्के बाजारहिस्सा मिळविण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

मुख्यतः द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणी शहरातील किमतीबाबत चोखंदळ ग्राहकांमध्ये ब्लू स्टारच्या उत्पादनांना सर्वाधिक मागणी असून, त्यांच्यासाठी २९,९९० रुपये किमतीपासून सुरू होणारे ३, ४ आणि ५ तारांकित इन्व्हर्टर स्प्लिट वातानुकूलन यंत्रे (एसी) हा परवडण्याजोगा आकर्षक पर्याय ठरेल, असा विश्वास ब्लू स्टार लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. त्यागराजन यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कंपनीला २०२३-२४ मध्ये बाजारहिस्सा १३.५ टक्क्यांवर जाणे अपेक्षित असून, त्यानंतर वर्षभरात तो १५ टक्क्यांच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न राहील, असे त्यागराजन म्हणाले. पुढील आर्थिक वर्षात विक्री केंद्रांचे जाळे ८,००० वरून २५ टक्क्यांनी वाढवून १०,००० नेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाढते नागरीकरण, प्रतिकूल हवामान आणि वाढता उष्मा, मध्यमवर्गीय आकांक्षांसह बदलती जीवनशैली, वीजवापरात कार्यक्षम उत्पादने या सर्व घटकांच्या परिणामी वातानुकूलन यंत्रांना येत्या काळात गरज म्हणून मोठी मागणी वाढणे अपेक्षित आहे. ८०-९० च्या दशकात वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटरच्या वापरासंबंधी दिसून आलेला दृष्टिकोनातील बदल आता वातानुकूलन यंत्रांबाबत जनमानसांत दिसून येत आहे. परिणामी सध्या घरगुती एसीचा ८० लाखांच्या घरात असलेली वार्षिक विक्री लवकरच वार्षिक दोन कोटींवर जाईल, असा अभ्यासाअंती अंदाज असल्याचे त्यागराजन म्हणाले. पश्चिम भारतात महाराष्ट्रात १० टक्के बाजार हिस्सेदारीसह ब्लू स्टारकडून वार्षिक १० लाख एसीची विक्री २०२२-२३ मध्ये झाली असल्याचे ते म्हणाले. केंद्राच्या ‘पीएलआय’ योजनेच्या परिणामी आयात होणाऱ्या घटकांवरील मदार कमी होऊन, कॉम्प्रेसर आणि चिप्स वगळता अनेक घटकांची स्वदेशात निर्मिती होऊ लागली असून, त्यातून किमतीही आकर्षक पातळीवर राखता आल्या असल्याचे ते म्हणाले.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 13:06 IST

संबंधित बातम्या