VRS After 20 Years of Service: पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने मंगळवारी केंद्रीय नागरी सेवा नियम, २०२५ मध्ये बदल केला. जे केंद्रीय कर्मचारी एनपीएस अंतर्गत जे कर्मचारी यूपीएसचा (एकीकृत पेन्शन योजनेचा) पर्याय निवडतील त्यांना २० वर्षांच्या सेवेनंतर स्वेच्छा निवृत्ती योजनेचा (VRS) लाभ घेता येईल. मात्र त्यांचे पैसे (Assured Payout) २५ वर्षांच्या सेवेनंतरच दिले जाईल. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने काढलेल्या निवेदनात म्हटले की, पूर्ण खात्रीशीर पेमेंट २५ वर्षांच्या सेवेनंतरच उपलब्ध होईल.
सेवानिवृत्तीच्या तारखेपासून निधीची रक्कम देय असेल. याशिवाय इतर फायदे म्हणजे वैयक्तिक निधीच्या ६० टक्के अंतिम रक्कम काढणे, प्रत्येक सहा महिन्यांच्या सेवेच्या कालावधीसाठी मूळ वेतनाच्या एक दशांशाव्या भागाचा एकरकमी लाभ आणि महागाई भत्ता, निवृत्ती ग्रॅच्युइटी, लीव्ह एनकॅशमेंट, CGEGIS फायदे निवृत्तीनंतर मिळू शकतात, अशी माहिती पीआयबीच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.
स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर खात्रीशीर देय निधी मिळण्यापूर्वीच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत कायदेशीररित्या विवाहित जोडीदाराला सदस्याच्या मृत्यूच्या तारखेपासून कौटुंबिक निवृत्तीवेतन रक्कम दिली जाईल, असेही या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.