Russian Oil Import Data: रशिया आणि युक्रेन यांच्या २०२२ मध्ये सुरू झालेल्या युद्धापासून भारताने रशियन कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादले आहे.

फिनलंडच्या सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले तेव्हापासून भारताची रशियन तेल खरेदी १३२ अब्ज (अंदाजे १३.३९ लाख कोटी) पर्यंत पोहोचली आहे.

याचबरोबर युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे अनेक पाश्चात देशांनी निर्बंध लादल्यानंतरही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रशियाचे तेल उपलब्ध होत आहे. तसेच भारत आणि चीन सारख्या देशांना ते कमी किमतीत खरेदी करता येत आहे.

भारताकडून रशियन तेल खरेदी सुरूच

अमेरिकेने रशियन तेल खरेदीवरून भारताविरोधातील आपली भूमिका कठोर केली आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी म्हटले आहे की, भारत आणि काही श्रीमंत भारतीय कुटुंबे रशियन तेल व्यापाराद्वारे मोठा नफा कमवत आहेत.

दरम्यान अमेरिकेने भारतावर लादलेले अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू होत असून, याला भारताने विरोध केला आहे. तसेच हे टॅरिफ अवास्तव आणि अन्याय्य असल्याचे म्हटले आहे. दरम्यान अमेरिकेने अतिरिक्त टॅरिफ लादल्यानंतरही भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियन तेल खरेदी सुरू ठेवण्याचा आपला पवित्रा कायम ठेवला आहे.

१४८ अब्ज रुपयांच्या जीवाश्म इंधनाची खरेदी

याव्यतिरिक्त, भारताने १६ अब्ज रुपयांचा रशियन कोळसादेखील खरेदी केला आहे. ज्यामुळे रशियाकडून एकूण जीवाश्म इंधन आयात १४८ अब्ज रुपयांवर पोहोचली आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेल, वायू आणि कोळशाच्या निर्यातीतून रशियाचे एकत्रित उत्पन्न ९३१ अब्ज रुपयांवर पोहोचले आहे, असे फिनलंडच्या सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या हवाल्याने इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या अहवालानुसार, चीनची रशियन तेलाची १९३ अब्ज रुपयांची आयात भारताच्या १०५ अब्ज रुपये आणि तुर्कीयेच्या ७१ अब्ज रुपयांच्या खरेदीपेक्षा जास्त होती.

रशियन आयातीत भारत कितव्या स्थानी?

चीन रशियाचा प्रमुख खरेदीदार म्हणून उदयास आला असून, चीनने रशियाकडून एकूण २६८ अब्ज रुपयांचे जीवाश्म इंधन आयात केले आहे. त्यानंतर या आयातीत युरोपियन युनियन २१३ अब्ज रुपये, भारत १४८ अब्ज रुपये आणि तुर्कीये १११ अब्ज रुपये यांचा क्रमांक लागतो.

पाश्चात्य देशांचा दुटप्पीपणा

सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या निष्कर्षांनुसार, फेब्रुवारी २०२२ पासून जीवाश्म इंधनापासून रशियाच्या उत्पन्नात युरोपियन युनियनने अंदाजे एक चतुर्थांश योगदान दिले आहे. असे असूनही, पाश्चात्य देश भारत आणि चीन रशियाचे कच्चे तेल खरेदी करत असल्याने पुतिन यांच्या युद्धयंत्रणेला बळ मिळत असल्याची टीका करत आहेत.