Amazon layoffs : गेल्या वर्षभरापासून AI मुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्यांना फटका बसत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. आयटीसह अनेक क्षेत्रातील लहान-मोठ्या कंपन्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांची कपात केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. यातच ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने आपल्या तब्बल १४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची चर्चा समोर आली होती. तसेच ही सर्वांत मोठी नोकर कपात मानली जात होती.

दरम्यान, या नोकर कपातीचं कारण एआय असल्याचंही बोललं जात होतं. पण आता यावर अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जॅसी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच कंपनीच्या १४,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या निर्णयाचं कारण पैसे किंवा एआय नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

सीईओ अँडी जॅसी यांनी म्हटलं की, “गेल्या काही वर्षांत अ‍ॅमेझॉन वेगाने वाढत असून कंपनीची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी नियोजन, संघटन, नेतृत्व आणि नियंत्रणाबाबत व्यवस्थापनाचे अनेक विभाग वाढवले असून एकमेकांना जोडले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात निर्णय घेण्याची प्रक्रिया मंदावली. तसेच काही टीममधील जबाबदाऱ्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे या नोकर कपातीचा उद्देश अॅमेझॉनला अधिक कार्यक्षम आणि केंद्रित बनवण्याचा आहे”, असं अँडी जॅसी यांनी म्हटलं आहे.

“विशेषतः अशा वेळी जेव्हा तंत्रज्ञान पूर्वीपेक्षा जास्त वेगाने विकसित होत आहे. कधीकधी लोकांच्या कामाचा वेग कमी होऊ शकतो. पण कंपनी तिच्या खर्चात किंवा कर्मचाऱ्यांच्या संख्येत आणि व्यवस्थापनात अधिक सुरळीपणा येण्यासाठी कंपनी योजना आखत आहे”, असंही कारण अँडी जॅसी यांनी सांगितलं. दरम्यान, सीएनएनच्या एका अहवालानुसार अँडी जॅसी यांनी गुरुवारी काही विश्लेषकांना सांगितलं की, “ही नोकर कपातीची घोषणा खरोखर आर्थिकदृष्ट्या प्रेरित नव्हती किंवा एआय प्रेरितही नव्हती.”

मोठ्या टेक कंपन्या कर्मचारी कपात का करत आहेत?

तंत्रज्ञान उद्योगात कपातीची लाट येण्यामागे एक कारण नाही, तर त्याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. धोरणात्मक, आर्थिक व रचनात्मक बदलांचे एकत्रित परिणाम यात दिसून येतात. गेल्या काही वर्षांमध्ये साथीच्या रोगादरम्यान मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी डिजिटल मागणी विक्रमी उच्चांकावर राहील या अपेक्षेने मोठ्या प्रमाणावर नोकरभरती केली. परंतु, त्यांचे अंदाज चुकीचे ठरले आणि विकासाचा वेग मंदावला, ज्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये अतिरिक्त कर्मचारी झाले. त्यामुळे त्यांच्या प्रॉफिट मार्जिनवर दबाव आला. परिणामी नोकरकपातीला सुरुवात झाली. तसेच, कंपन्या त्यांचे लक्ष आणि निधी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ऑटोमेशन आणि क्लाउड कॉम्प्युटिंग व डेटा इन्फ्रास्ट्रक्चरसारख्या उच्च-विकास क्षेत्रांकडे वळवत आहेत.