Elon Musk Net Worth: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर मस्क यांच्या एकूण संपत्तीवर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले होते. ट्रम्प यांच्या ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ या विधेयकाचा मस्क यांनी जाहीर विरोध केला होता. यावरून सोशल मीडियावर दोघांमध्ये खटके उडाल्याचे दिसले. त्यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांची जाहीर माफी मागितली. या माफिनाम्यानंतर आता मस्क यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार, एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांना फोन करून संवाद साधला. एलॉन मस्क, उपाध्यक्ष जेडी वान्स आणि व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ सूसी विल्स यांच्यात झालेल्या एका खासगी चर्चेनंतर ट्रम्प आणि मस्क यांचा संवाद झाला. या कॉल दरम्यान दोघांनीही तोडगा काढण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे सांगितले जाते.

संपत्तीमध्ये किती वाढ झाली?

फोर्ब्स रिअल टाइम बिलेनियर रँकिंगच्या माहितीनुसार, मस्क यांच्या माफिनाम्यानंतर त्यांची संपत्ती १९१ दशलक्ष डॉलर्स वाढून ४११ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. बुधवारी रात्री मस्क यांनी एक्सवर पोस्ट लिहून दिलगिरी व्यक्त केली होती. त्यात ते म्हणाले, “मागच्या आठवड्यात ट्रम्प यांच्याबाबतीत लिहिलेल्या काही पोस्टबद्दल मला खेद वाटतो. हा विषय जरा जास्तच ताणला गेला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, मस्क यांची दिलगिरी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारली असून त्याचे कौतुकही त्यांनी केले आहे. आम्ही अमेरिकेच्या लोकांसाठी काम करण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहोत.