नवी दिल्ली : बँका आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यानी नवीन भांडवली विस्तार गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि देशातील उद्यमशील भावनेला बळ देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सोमवारी केले. आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी वित्तीय स्थिरता आणि किंमत स्थिरता या दोन गोष्टी आवश्यक असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.
‘फिक्की’ आणि भारतीय बँक महासंघ (इंडियन बँक्स असोसिएशन – आयबीए) यांच्या वतीने आयोजित ‘एफआयबीएसी २०२५’ परिषदेत मल्होत्रा बोलत होते. ते म्हणाले की, वित्तीय क्षेत्रातील संस्थांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचा देशातील नागरिकांपर्यंत फायदा पोहोचण्यास मदत होईल. उद्योगांनी अधिकाधिक गुंतवणूक करून देशातील उद्यमशीलतेची प्रेरणा जिवंत ठेवावी. बँका आणि कंपन्यांनी एकत्र येऊन सध्याच्या घडीला आवश्यक असलेल्या गुंतवणूक चक्राला गती देण्याची त्यांनी हाक दिली.
रिझर्व्ह बँकेचे प्रमुख उद्दिष्ट हे महागाईत टिकाऊ स्थिरतेसाठी पतधोरण आखण्याचे आहे. हे करीत असताना बँकेने विकासाच्या उद्दिष्टाकडे डोळेझाक केलेली नाही. महागाई दरावर नियंत्रणाचे प्राथमिक उद्दिष्ट गाठत असताना विकासाचे उद्दिष्टही पाहिले जात आहे. याचबरोबर व्यवसायस्नेही वातावरणात वाढ करण्यासाठी मध्यवर्ती बँक पावले उचलत आहे, असे मल्होत्रा म्हणाले.
जागतिक पातळीवरील अनिश्चित आर्थिक वातावरणाबाबत मल्होत्रा म्हणाले की, सध्या जागतिक पातळीवर अत्यंत अनिश्चित वातावरण असून, भारताची यातून दमदारपणे वाटचाल सुरू आहे. हा देशासाठी महत्वाचा टप्पा आहे. आपण आपल्या वाटेत येणाऱ्या विकासाच्या संधी हेरायला हव्यात. भारताच्या अर्थव्यवस्थेने कैकपटीने विस्तार साधला आहे आणि ते जगापुढे कणखरता आणि आशेचे प्रतीक असेल, असेही मल्होत्रा यांनी नमूद केले.
धोरण पुनर्विचार कक्ष
रिझर्व्ह बँकेने नियामक धोरण पुनर्विचार कक्षाचा प्रस्ताव पुढे आणला आहे. या माध्यमातून प्रत्येक नियमाचा सर्वांगीण, तटस्थ, व्यवस्थात्मक आणि रचनात्मक पुनर्विचार केला जाईल. एखादा नियम लागू केल्यानंतर त्याचा होणारा परिणाम अभ्यासण्यात येणार आहे. याचबरोबर सद्यःस्थितीत त्यांची गरज आणि बाजारपेठेतील वास्तव या गोष्टीही तपासण्यात येतील. या कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक नियमावलीचा दर ५ ते ७ वर्षांनी पुनर्विचार केला जाईल, असे मल्होत्रा यांनी स्पष्ट केले.
रिझर्व्ह बँकेचे प्रमुख उद्दिष्ट हे महागाईत टिकाऊ स्थिरतेसाठी पतधोरण आखण्याचे आहे. हे करीत असताना बँकेने विकासाच्या उद्दिष्टाकडे डोळेझाक केलेली नाही. महागाई दरावर नियंत्रणाचे प्राथमिक उद्दिष्ट गाठत असताना विकासाचे उद्दिष्टही पाहिले जात आहे. याचबरोबर व्यवसायस्नेही वातावरणात वाढ करण्यासाठी बँक पावले उचलत आहे. – संजय मल्होत्रा, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक