मुंबई : विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) किंवा इतर तपास यंत्रणांद्वारे अदानी समूहाविरुद्धच्या आरोपांची चौकशी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अंतिम निकालपत्रांतून स्पष्ट केल्याने अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला. परिणामी बुधवारच्या सत्रात अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे समभाग १८ टक्क्यांपर्यंत वधारले.

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ ही चौकशीसाठी समर्थ असून तिने तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी बुधवारी स्पष्ट केले. एकंदरीत यातून हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाने उठवलेला धुरळा पूर्णत्वाने निवळला असून, त्याचे सकारात्मक प्रतिबिंब अदानी समूहातील सर्व दहाही सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागमूल्यात उमटले.

हेही वाचा >>> Stock Market Updates : ‘सेन्सेक्स’मध्ये पाच शतकी घसरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई शेअर बाजारात अदानी एनर्जी सोल्युशन्सचा समभाग १७.८३ टक्क्यांनी म्हणजेच १२०.७५ रुपयांनी वधारून १,१८३.२० रुपयांवर बंद झाला. त्यापाठोपाठ गेल्यावर्षी ताब्यात घेतलेल्या एनडीटीव्हीचा समभाग ११.३९ टक्क्यांनी, अदानी टोटल गॅस ९.९९ टक्क्यांनी, अदानी ग्रीन एनर्जी ९.१३ टक्क्यांनी आणि अदानी एंटरप्रायझेस ९.११ टक्क्यांनी वधारले. तसेच अदानी विल्मरचे समभाग ८.५२ टक्क्यांनी, अदानी पॉवर ४.९९ टक्क्यांनी वाढले. दुसरीकडे अंबुजा सिमेंट ५.२० रुपयांनी वधारला आणि ५३६.१० रुपयांवर स्थिरावला. त्याने सत्रात ५४९ रुपयांची ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला. त्याबरोबर अदानी पोर्टने देखील ११४४ रुपयांची ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ‘सेबी’ला अदानी समूहाविरुद्धच्या आरोपांशी संबंधित दोन प्रलंबित प्रकरणांची चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नमूद केले की, सेबीने अदानी समूहावरील आरोपांशी संबंधित २४ पैकी २२ प्रकरणांची चौकशी पूर्ण केली आहे. गेल्यावर्षी अमेरिकी सरकारने देखील अदानी समूहावरील हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोप दखलपात्र नसल्याचे म्हटले होते.