Advance Tax Deadline : तुम्ही जर नियमितपणे प्राप्तीकर भरत असाल आणि तुम्हाला कुठलाही दंड किंवा नोटीस येऊ नये असं वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. प्राप्तीकराची आगाऊ रक्कम (अॅडव्हान्स टॅक्स) भरण्याची डेडलाइन १५ मार्च आहे. आज १४ तारीख आहे त्यामुळे तुम्हाला हा अॅडव्हान्स भरण्यासाठी अवघे चोवीस तासच उरले आहेत.

१५ मार्च २०२५ पूर्वी आगाऊ प्राप्तीकर न भरल्यास काय होईल?

१५ मार्च २०२५ पूर्वी जर करदात्यांनी त्यांचा आगाऊ प्राप्तीकर भरला नाही तर त्या करदात्यांना कलम २३४ ब आणि कलम २३३ क प्रमाणे व्याज आणि दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.

अॅडव्हान्स टॅक्स म्हणजे नेमकं काय?

अॅडव्हान्स टॅक्स म्हणजे जर समजा तुम्ही करदाते आहात आणि तुमचा वार्षिक प्राप्तीकर १० हजार रुपयांहून जास्त आहे तर तुम्हाला वर्षभरात चार भागांमध्ये हा प्राप्तीकर आगाऊ भरावा लागतो. सरकारने अॅडव्हान्स टॅक्स ही योजना आणली आहे करदात्यांवर एकाचवेळी जास्त रक्कमेचा बोजा पडू नये म्हणून ही योजना आणण्यात आली आहे. तसंच या योजनेमुळे सरकारलाही नियमित रुपात महसूल मिळतो.

कुणाला भरावा लागतो अॅडव्हान्स टॅक्स?

१० हजारांहून अधिक वार्षिक प्राप्तीकर जे करदाते भरतात अशा सगळ्या करदात्यांना अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो.

स्वतंत्र व्यवसाय किंवा फ्री लान्सिंग करणारे करदाते ज्यांच्या उत्पन्नावर टीडीएस लागत नाही.

पगार मिळणारे किंवा इतर कुठल्याही प्रकारे पैसे कमवणारे करदाते जसं की रेंटल इन्कम, एफडीचं व्याज, शेअर बाजारात नफा कमवणारे असे सगळे करदाते यात येतात.

१५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत जर कुणाला त्यांची मालमत्ता विक्री करायची आहे तर त्यांनाही अॅडव्हान्स टॅक्सची रक्कम भरणं अनिवार्य असतं.

जर पगारदारांच्या पगारातून टीडीएस कापला गेला असेल तर त्या पगारदारांना अॅडव्हान्स टॅक्स भरावा लागत नाही. पण जर पगाराच्या शिवाय कुठलं उत्पन्न तुम्हाला मिळत असेल तर त्यावरचा आगाऊ प्राप्तीकर तुम्हाला भरावा लागतो.

कसा आणि कधी भरला जातो अॅडव्हान्स टॅक्स?

अॅडव्हान्स टॅक्स भरण्यासाठीच्या वर्षभरातल्या चार तारखा नेमून दिल्या आहेत. १५ जूनला पहिला हिस्सा म्हणजे एकूण प्राप्तीकराच्या १५ टक्के रक्कम भरावी लागते. त्यानंतर १५ सप्टेंबरला दुसरा हिस्सा म्हणजेच प्राप्तीकराच्या ४५ टक्के रक्कम भरावी लागते. १५ डिसेंबरला तिसरा हिस्सा म्हणजेच प्राप्तीकराच्या ७५ टक्के रक्कम भरावी लागते तर १५ मार्चला चौथा हिस्सा म्हणजेच जो प्राप्तीकर लागणार आहे त्याच्या ९० टक्के रक्कम भरावी लागते. जर ही रक्कम भरली गेली नाही तर ३१ मार्च पर्यंतचीही मुदत पुढे दिली जाते. मात्र ३१ मार्चपर्यंतही प्राप्तीकराचा ९० टक्के अॅडव्हान्स टॅक्स भरला नाही तर १ एप्रिलपासून ITR फाईल करण्यासाठी प्रत्येक महिन्याला १ टक्का याप्रमाणे दंड भरला जातो.

अॅडव्हान्स टॅक्स वेळेवर न भरल्यास काय होतं?

अॅडव्हान्स टॅक्स जर वेळेवर भरला नाही तर इन्कम टॅक्स अॅक्टच्या कलम २३४ ब आणि २३४ क च्या अन्वये दंड भरावा लागेल आणि व्याजही भरावं लागेल.

१५ मार्च पर्यंत ९० टक्के टॅक्स जमा केला नाही तर सरकारकडून प्रतिमाह १ टक्का व्याज वसूल गेलं जाईल.

प्राप्तीकर विभागाने जर तुम्हाला नोटीस पाठवली तर अडचणी वाढू शकतात.

ऑनलाइन अॅडव्हान्स टॅक्स कसा भरायचा?

http://www.incometax.gov.in या वेबसाइटवर जा.
या वेबसाईटवर E-Pay Tax चा पर्याय निवडा
पॅन क्रमांक आणि आधार-पॅनला लिंक असलेला मोबाइल नंबर नोंदवा
असेसमेंट इअर २०२५-२६ चा पर्याय निवडा.
टाइप ऑफ पेमेंटमध्ये अॅडव्हान्स टॅक्सचा पर्याय निवडा आणि कंटीन्यूचा पर्याय क्लिक करा.
त्यानंतर तुमची रक्कम भरा. ही रक्कम नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI द्वारे भरता येते.
कर भरणा केल्यानंतर चलन येतं. हे ई चलन तुम्हाला आयटीआर फायलिंगपर्यंत सांभाळून ठेवावं लागणार आहे.