न्यूयॉर्क : व्यवसायात प्रचंड आर्थिक तोटा सोसत असलेल्या आणि कधी काळी सिलिकॉन व्हॅलीतील अग्रणी असलेल्या इंटेलमध्ये गेल्या महिन्यांत अमेरिकेच्या सरकारने १० टक्के हिस्सेदारी घेत मदतीचा हात दिला. गुरुवारी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी एनव्हिडियाने मोठ्या गुंतवणुकीसह तिच्याशी ऐतिहासिक भागीदारी करत असल्याची घोषणा केली. या बातमीने अडगळीत पडलेला इंटेलच्या शेअरचा भाव तब्बल २५ टक्क्यांनी उसळी घेताना दिसला आणि अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटने नवीन उच्चांकाच्या दिशेने आगेकूच कायम ठेवली.

जगातील आघाडीच्या चिपनिर्मात्या एनव्हीडियाने इंटेलमध्ये ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत असल्याचे गुरुवारी जाहीर केले. उभयतांमधील सहयोग हा कृत्रिम प्रज्ञा (एआय) क्षेत्रात पायाभूत सुविधा तसेच वैयक्तिक संगणक उत्पादनांचा कणा असलेल्या कस्टम डेटा सेंटरवर काम करण्याच्या उद्देशाने आहे, असे एनव्हीडियाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

इंटेलच्या समभागाच्या प्रत्येकी २३.२८ डॉलर दराने ही भागभांडवली हिस्सा खरेदी होणार असून त्यासाठी ५ अब्ज डॉलर्स खर्च केले जाणार असल्याची घोषणा एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सेन हुआंग यांनी केली.

हुआंग म्हणाले, आम्ही एकत्रितपणे आमच्या परिसंस्थांचा विस्तार करू, ज्यायोगे संगणकीय युगाचा पाया रचला जाईल. दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले की, डेटा सेंटरसाठी, इंटेलकडून उपयुक्त चिप्सची निर्मिती केली जाईल ज्याचा वापर एनव्हिडियाकडून एआय पायाभूत सुविधा मंचामध्ये केला जाईल. पीसी उत्पादनांसाठी, इंटेल आणि एनव्हिडियाच्या तंत्रज्ञानाचा मिलाफ साधणाऱ्या चिप्स एकत्रितपणे तयार केल्या जातील.

गेल्या वर्षी इंटेलने जवळजवळ १९ अब्ज डॉलर आणि या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत आणखी ३.७ अब्ज डॉलर्सचा तोटा नोंदविला आहे. २०२५ च्या अखेरीस कंपनीने कर्मचारी संख्याबळ एक चतुर्थांशांनी कमी करण्याची योजना आखली आहे. अमेरिकेच्या सरकारने गेल्या महिन्यात १० टक्के हिस्सा मिळवून इंटेलच्या सर्वात मोठ्या भागधारकांपैकी एक म्हणून स्थान मिळविले.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला इंटेलच्या मुख्याधिकारी लिप-बु टॅन यांच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्न उपस्थित करून, ते या नोकरीसाठी अयोग्य असल्याची टीका केली. मात्र टॅन यांनी ट्रम्प यांची नंतर प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर समेट घडून आला आणि नंतर काही आठवड्यांनी अमेरिकी प्रशासनाने हिस्सा खरेदीची घोषणा केली.

इंटेलला नवसंजीवनी

हा करार इंटेलला नवसंजीवनी प्रदान करणारा ठरेल. एकेकाळी सिलिकॉन व्हॅलीतील अग्रणी असलेल्या इंटेलच्या प्रोसेसरने वैयक्तिक संगणक क्रांतीला चालना दिली आणि अनेक दशकांच्या व्यवसाय वाढीचा लाभही कंपनीने घेतला. परंतु आयफोनच्या २००७ मधील पदार्पणामुळे चित्र झपाट्याने पालटले. मोबाइलने संगणकीय युगात केलेल्या बदलाने इंटेलचा बाजारहिस्सा तीव्रतेने घटत गेला. अलिकडच्या वर्षांत तर एनव्हिडियाला जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनवणाऱ्या एआयने निर्माण केलेल्या तेजीच्या स्पर्धेत इंटेलची आणखी पीछेहाट झाली.