मुंबई: अडीअडचणीला मदत म्हणून कर्ज मिळविण्यासाठी सोने, स्थावर मालमत्ता अथवा चालू स्थितीतील व्यापार-धंदाच तारण ठेवण्याच्या रूढ प्रघाताला पर्याय म्हणून येत्या काळात म्युच्युअल फंडांच्या बदल्यात कर्जाची पद्धत लोकप्रिय ठरत आहे. विशेषतः सध्या दीर्घकालीन उद्दिष्टानुरूप म्युच्यु्अल फंडातील गुंतवणुकीकडे लोकांचा वाढता कल आणि ४० लाख कोटी रुपयांच्या घरात गेलेली एकूण गुंतवणूक पाहता, हा कर्ज पर्याय किफायतशीर आणि सोयीचाही बनला आहे.
अलीकडेच स्थापनेची १५ वर्षे पूर्ण करणाऱ्या मिरॅ ॲसेट म्युच्युअल फंडाशी संलग्न बँकेतर वित्तीय कंपनी ‘मिरॅ ॲसेट फायनान्शियल सर्व्हिसेस’ने सुरू केलेल्या म्युच्युअल फंड तारण ठेवून कर्ज देण्याच्या योजनेत पहिल्या नऊ महिन्यांत ११० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. मिरॅ ॲसेट फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा कन्हैया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना, डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत मंजूर कर्जाच्या या रकमेत सहा पटीने वाढ होऊन ती ६०० कोटी रुपयांवर जाईल, असे अंदाजले आहे.
अर्ज केल्यापासून अगदी १५ मिनिटांत कर्ज मंजुरीची संपूर्ण डिजिटल व कागदरहित प्रक्रिया, सध्या गृह कर्जासाठी आकारल्या जाणाऱ्या व्याजदराइतकेच म्हणजे ९ टक्के व्याज दर आणि सरसकट ९९९ रुपये या प्रक्रिया शुल्कानिशी कर्ज अशी या योजनेची वैशिष्ट्य कृष्णा कन्हैया यांनी सांगितली. समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंडांच्या बदल्यात किमान १० हजार रुपये ते कमाल १ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज, तर रोखेसंलग्न (डेट) म्युच्युअल फंडांच्या बदल्यात कमाल ३ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळविता येते. इक्विटी फंडांच्या गुंतवणूक मूल्याच्या ४५ टक्के मर्यादेपर्यंत, तर डेट फंडांच्या गुंतवणूक मूल्याच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत कर्ज मिळविले जाऊ शकेल.
आर्थिक नियोजनांच्या आखणीत लांबच्या पल्ल्याच्या उद्दिष्टासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते आणि या गुंतवणुकीला कोणत्याही प्रकारची बाधा न आणता, तिचा वापर कर्जरूपाने आर्थिक गरज भागवण्यासाठी करण्याच्या तुलनेने किफायतशीर व सोयीस्कर अशा या पर्यायाला चांगली स्वीकृती मिळत असल्याचे कृष्णा कन्हैया म्हणाले. कंपनीकडून सध्या वितरित कर्जाचे प्रति ग्राहक सरासरी प्रमाण हे ६ ते ७ लाखांच्या घरात आहे. व्यावसायिक खेळत्या भांडवलासाठी तर पगारदार ग्राहक वाहन अथवा गृहोपयोगी वस्तू खरेदीसाठी या कर्ज प्रकाराचा वापर करीत आहेत, असे ते म्हणाले. लवकरच सार्वभौम सुवर्ण रोखे तारण ठेवून कर्ज देण्याची योजना तसेच वैयक्तिक कर्ज योजनाही सुरू करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.