मुंबई : ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी अमेझॉनने मुंबईतील ठराविक भागांमध्ये अवघ्या १० मिनिटांमध्ये घरपोच वस्तू देणाऱ्या अमेझॉन नाऊ सेवा सुरू करण्याची गुरुवारी घोषणा केली आहे. बेंगळुरू आणि दिल्लीमध्ये यशस्वीरित्या सेवा सुरू केल्यानंतर मुंबईकरांना अमेझॉनच्या मंचावरून १० मिनिटात घरपोच वस्तू मिळणार आहे.
वस्तू जलद घरपोच देण्यासाठी अमेझॉनने तीन शहरांमध्ये १०० हून अधिक सूक्ष्म-पूर्ती केंद्रे उघडली आहेत आणि वर्षाच्या अखेरीस आणखी १०० केंद्रे उघडण्याची योजना आहे, असे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अमेझॉन नाऊच्या माध्यमातून अवघ्या १० मिनिटात किराणा, वैयक्तिक निगा आणि सौंदर्य प्रसादने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, लहान मुलांसाठी आवश्यक वस्तू ते पाळीव प्राण्यांशी निगडित वस्तूंपर्यंत हजारो दैनंदिन जीवनावश्यक वस्तू घरपोच केल्या जातात. काही वस्तू मिनिटांत वितरित केल्या जातात, तर ४०,००० वस्तू काही तासांत पोहोचवल्या जातात.
विद्यमान वर्षाच्या सुरुवातीला बेंगळुरूमध्ये अमेझॉन नाऊ सादर केले, फक्त १० मिनिटांत आवश्यक वस्तू ग्राहकांच्या घरी पोहोचवल्या आहेत. यामुळे दररोजच्या कार्यादेशांमध्ये दरमहा २५ टक्क्यांनी वाढ होत आहे. या यशामुळे, १०० हून अधिक सूक्ष्म-पूर्ती केंद्रे वाढवली आहेत आणि बेंगळुरू, दिल्ली आणि मुंबईमध्ये आणखी केंद्रे जोडण्याची योजना असल्याचे अमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक समीर कुमार म्हणाले. सध्या निवडक पिनकोडमध्ये कार्यरत असलेले अमेझॉन नाऊ विस्तारत राहील आणि येत्या काही महिन्यांत इतर शहरांमध्येही सुरू करण्याची योजना आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
मिनिटामिनटांची स्पर्धा अमेझॉन नाऊ आता अधिक जलद सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. कारण ब्लिंकिट, इन्स्टामार्ट आणि झेप्टो सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचा यात समावेश आहे. तसेच फ्लिपकार्ट मिनिट्स आणि जिओमार्ट सारख्या भारतीय प्रतिस्पर्धी देखील चांगली टक्कर देत आहेत.