जागतिक आयफोन निर्माता कंपनी ॲपलने भारतात आयफोन १७ च्या विक्रीतून बक्कळ कमाई केली आहे आणि त्या परिणामी कंपनीने भारतातील व्यवसायातून विक्रमी महसूल नोंदवला आहे. ॲपलने सप्टेंबरच्या तिमाहीत भारतातून सर्वाधिक महसूल नोंदवल्याने, जागतिक स्तरावर एकूण विक्री सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत १०२.५ अब्ज डॉलरच्या घरात पोहोचली. विक्रीत वार्षिक आधारावर ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर कंपनीने आर्थिक वर्षात आतापर्यंत विक्रमी ४१६ अब्ज डॉलरचा महसूल नोंदवला आहे.

देशांतर्गत भागात विस्तार आणि स्थानिक पातळीवर केलेल्या उत्पादनामुळे भारतात ॲपलने सलग १४ व्या तिमाहीत हे विक्रीतील लक्षणीय वाढीचे यश प्राप्त केले आहे, असे ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक म्हणाले. सप्टेंबर तिमाहीत भारतातील बाजारपेठेने महसुलात उदयोन्मुख बाजारपेठेच्या गटातून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यामुळे चालू वर्षात आतापर्यंत ४१६ अब्ज डॉलरच्या विक्रमी महसुलाची कंपनीने पातळी गाठता आली आहे.

‘आयडीसी’च्या आकडेवारीनुसार, २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ॲपलने विक्रमी ४९ लाख आयफोन निर्यात केले. मुख्यतः छोट्या शहरांमध्ये चांगली मागणी आणि स्थानिक पातळीवर उत्पादित आयफोन १७ बाजारात सादर केल्याने विक्री वाढली. सप्टेंबर २०२५ मध्ये सादर करण्यात आलेल्या आयफोन १७ या नवीन उत्पादनाचे एकूण निर्यातीत २० टक्के योगदान राहिले आहे.

सप्टेंबरमध्ये, ॲपलने त्यांची आयफोन १७ सिरीज सादर केली, ज्यामध्ये आयफोन १७, आयफोन १७ एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. कंपनीच्या एकूण महसुलात, आयफोनचा महसूली वाटा ४९ अब्ज डॉलर इतका आहे, ज्यात वार्षिक आधारावर ६ टक्के वाढ झाली आहे. ॲपलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य वित्त अधिकारी केवन पारेख यांनी नमूद केले की, कंपनी विक्री करत असलेल्या बहुतेक बाजारपेठांमध्ये आयफोनची विक्री वाढली आहे, ज्यामुळे लॅटिन अमेरिका, आखाती देश आणि दक्षिण आशियासह अनेक उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये सप्टेंबर तिमाहीत नवीन विक्रम प्रस्थापित झाले असून, भारतातही विक्रमाची मालिका कायम आहे.

आयफोन १७ चा तुटवडा

सध्याच्या पुरवठ्यातील अडचणींना तोंड देताना कुक म्हणाले की, आयफोन १७ तुटवडा आहे आणि ही समस्या उत्पादन क्षमतेमुळे नव्हे तर अधिक मागणीमुळे उद्भवली आहे. मात्र पुरवठा/मागणी कधी सुरळीत होईल, याबाबद्दल निश्चित वेळ सांगता येणार नाही. ती दरी भरून काढण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहोत, कारण शक्य तितकी जास्त उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहेत.