पीटीआय, नवी दिल्ली
देशातील निर्मिती क्षेत्राने मागील चार महिन्यांतील सर्वाधिक सक्रियता सरलेल्या एप्रिलमध्ये दाखविल्याचे मासिक सर्वेक्षणातून सोमवारी स्पष्ट झाले. नवीन कामाच्या प्रमाणात आणि आनुषंगिक उत्पादनांतही झालेली वाढ यासाठी कारणीभूत ठरली आहे. आगामी काळात मागणीतील सातत्य आणि उत्पादनातील वाढ कायम राहण्याचेही सर्वेक्षणाचे संकेत आहेत.
देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या ‘एस अँड पी ग्लोबल इंडिया’द्वारे केलेल्या सर्वेक्षणावर बेतलेला निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणारा (पीएमआय) निर्देशांक एप्रिलमध्ये ५७.२ गुणांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात तो ५६.४ असा नोंदला गेला होता. या सर्वेक्षणातील कलानुसार भारत ही वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक ठरणार आहे. जागतिक पातळीवरील मंदीच्या सावटामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांच्या वाढीचा वेग कमी झाला आहे.
आणखी वाचा-फर्स्ट रिपब्लिक बँकेचा ताबा ‘जेपीमॉर्गन चेस’कडे
एप्रिल महिन्याचा पीएमआय आकडेवारीने सलग २२ व्या महिन्यात एकूण कार्यात्मक परिस्थितीत सुधारणा दर्शविली आहे. म्हणजेच हा निर्देशांक जवळपास दोन वर्षे ५० गुणांपुढे विस्तारपूरकता दर्शविणारा राहिला आहे. चालू आर्थिक वर्षात आगामी काळातही निर्मिती क्षेत्रातील वाढ सकारात्मक राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
याबाबत एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या अर्थतज्ज्ञ पॉलिआना डी लिमा म्हणाल्या की, एप्रिलमध्ये नवीन कामाच्या प्रमाणात आणि उत्पादनात झालेली वाढ निर्मिती क्षेत्राचा वेगाने विस्तार होण्यास कारणीभूत ठरली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली विक्री आणि पुरवठा साखळीतील सुधारणा यामुळे कंपन्यांवरील दबाव सौम्य झाला असून, त्याचा फायदा त्यांना होत आहे.
भारतीय निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांसमोर मोठ्या प्रमाणात संधी असून, त्यामुळे त्यांची आगेकूच सुरू राहील. चालू वर्षात एप्रिलमध्ये नवीन कामाच्या मागणीत सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. रोजगाराच्या संख्येतही वाढ नोंदवण्यात आली आहे. -पॉलियाना डी लिमा, अर्थतज्ज्ञ, एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स