लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: केंद्र सरकारने ‘रिअल मनी गेमिंग’ अर्थात ऑनलाइन खेळांच्या जुगारावर संपूर्ण प्रतिबंध आणणारे विधेयक मंजूर केल्यांनतर देशातील आघाडीच्या कंपन्यांनी त्यांचे मोबाइल गेमिंग ॲप बंद केले. याचा जबर फटका असाही की, ड्रीम ११ सह इतर तीन गेमिंग कंपन्या ते मिरवत असलेले ‘युनिकॉर्न’पदही गमावून बसल्या आहेत.

एक अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षाही अधिक बाजारमूल्य असलेल्या खासगी नवउद्यमी उपक्रम अर्थात स्टार्टअप्सना ‘युनिकॉर्न’ ही मानाची श्रेणी बहाल केली जाते. ही युनिकॉर्न श्रेणी गमावलेल्या कंपन्यांमध्ये ड्रीम११, गेम्स२४एक्स७, गेम्सक्राफ्ट आणि मोबाइल प्रीमियर लीग (एमपीएल) यांचा समावेश आहे, असे ‘एएसके प्रायव्हेट वेल्थ हुरुन इंडिया युनिकॉर्न अँड फ्युचर युनिकॉर्न रिपोर्ट २०२५’ या गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने म्हटले आहे. युनिकॉर्न श्रेणीतून बाहेर पडलेल्या गेम्सक्राफ्टचे ३ कोटी, मोबाइल प्रीमियर लीगचे ९ कोटी, ड्रीम११ चे २६ कोटी तर गेम्स२४ एक्स ७ चे १२ कोटी वापरकर्ते एकेसमयी होते.

युनिकॉर्न नसलेल्या ‘झुपी’ आणि ‘विंझो गेम्स’चे मूल्यांकन देखील कायद्यामुळे प्रभावित झाले आहे. गेल्या महिन्यात संसदेने सर्व प्रकारच्या ‘रिअल मनी गेमिंग’वर बंदी घालत ई-स्पोर्ट्स आणि ऑनलाइन सोशल गेमिंगला प्रोत्साहन देण्यासाठी विधेयक मंजूर केले. या कायद्यात ‘रिअल मनी गेमिंग’शी संबंधित जाहिरातींवरही बंदी आली आहे, तसेच बँका आणि वित्तीय संस्थांना अशा कोणत्याही उलाढालींना सुकर करणारे निधी हस्तांतरणास मनाई करण्यात आली आहे.

या नवीन कायद्यामुळे भारतातील सर्व प्रमुख गेमिंग कंपन्यांच्या मूल्यांकनावर परिणाम झाला आहे, असे हुरूनच्या अहवालात म्हटले आहे. आता या नवउद्यमींच्या प्रसिद्धी आणि कामगिरीवर मर्यादा आल्या आहेत, ज्यामुळे त्यांची वाढ मंदावेल. या कायद्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाला आहे, असेही अहवालाने म्हटले आहे.

युनिकॉर्नची भर

सरकारच्या या निर्णयानंतर ‘रिअल मनी गेमिंग’ कंपन्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व काढून घेण्यासह मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याची योजना आखली आहे. दरम्यान, गेमिंग कंपन्यांमध्ये घट झाली असली तरी, या वर्षी ‘युनिकॉर्न’पद मिळविणाऱ्या भारतीय नवउद्यमींची एकूण संख्या सहाने वाढून ७३ झाली आहे. या वर्षात ११ नवीन युनिकॉर्न उदयास आले, ज्यात एआय डॉट टेक, नावी टेक्नॉलॉजीज, विव्रीती कॅपिटल, वेरिटास फायनान्स, रॅपिडो, नेट्राडीन, जंबोटेल, डार्विनबॉक्स, मनीव्ह्यू, जस्पे आणि ड्रूल्स यांचा समावेश आहे. डिस्काउंट ब्रोकर झिरोधा ८.२ अब्ज अमेरिकी डॉलरसह सर्वात मौल्यवान भारतीय नवउद्यमी आहे. त्यानंतर फिनटेक रेझरपे आणि लेन्सकार्ट हे प्रत्येकी ७.५ अब्ज अमेरिकी डॉलरसह आघाडीवर आहेत.

मुंबई तिसऱ्या स्थानी

बेंगळुरू हे भारतातील युनिकॉर्न केंद्र म्हणून २६ नवउद्यमींसह आघाडीवर आहे ज्यांचे एकत्रित मूल्यांकन ७० अब्ज अमेरिकी डॉलर आहे. त्यानंतर दिल्ली-एनसीआर १२ नवउद्यमींसह ३६.३ अब्ज अमेरिकी डॉलर आणि मुंबईत ११ युनिकॉर्न नवउद्यमी असून त्यांचे मूल्यांकन २२.८ अब्ज अमेरिकी डॉलर आहे. झेप्टोचे २२ वर्षीय कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा हे भारतातील सर्वात तरुण युनिकॉर्न संस्थापक आहेत.