वृत्तसंस्था, ओहामा
जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची घोषणा सोमवारी केली. बर्कशायर हॅथवे या कंपनीच्या मुख्याधिकारी पदावरून या वर्षाच्या अखेरीस ते पायउतार होत असून, त्यांच्या पश्चात उपाध्यक्ष ग्रेग ॲबेल यांना त्यांनी कंपनीची धुरा सोपवली आहे.
बर्कशायरच्या प्रमुखपदी बफे हे तब्बल ६० वर्षे होते. या माध्यमातून त्यांनी जगभरात कीर्ती आणि गुंतवणुकीचे आदर्श स्थापित केले. अब्जाधीश असलेले बफे हे यशस्वी अमेरिकी नागरिकाचे उदाहरणही मानले जातात. सोमवारी बफे यांनी बर्कशायरच्या ओहामा येथे झालेल्या वार्षिक सभेला हजेरी लावली. सभेला संबोधित करताना ९४ वर्षीय बफे म्हणाले की, ॲबेल ग्रेग यांनी कंपनीच्या मुख्याधिकारीपदाची धुरा सांभाळण्याची आता वेळ आली, असे मला वाटते. मी तुमच्या आजूबाजूला असेन. काही गोष्टींमध्ये मी तुम्हाला उपयोगी पडेन. मात्र अंतिम शब्द हा ॲबेल यांचाच असेल.
ॲबेल ग्रेग हे ६२ वर्षांचे असून, ते २०१८ पासून बर्कशायरचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांची २०२१ मध्ये मुख्य कार्यकारी म्हणून निवड झाल्यानंतर ते बफे यांचे उत्तराधिकारी असतील हे स्पष्ट झाले होते. त्यांना बफे यांच्यासारखे वलय नसले तरी हा वारसा त्यांच्याकडून चालविला जाणे अपेक्षित आहे. निवृत्तीची घोषणा करण्याची योजना बफे यांनी ॲबेल यांच्यासह कंपनीच्या संचालक मंडळाला आधी सांगितली नव्हती. याचबरोबर बफे यांनी कंपनीतील हिस्सा विकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर हा हिस्सा दान केला जाणार आहे.
१.१६ लाख कोटी डॉलरचा प्रवास
बर्कशायर ही आर्थिक संकटात असलेली वस्त्रोद्योगातील कंपनी बफे यांनी ताब्यात घेऊन ६० वर्षांत १.१६ लाख कोटी रुपयांवर पोहोचविली. विविध क्षेत्रात त्यांनी कंपनीचा व्यवसाय विस्तार केला. फोर्ब्स नियतकालिकाच्या माहितीनुसार, बफे याच्याकडे १६८.२ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. यातील बहुतांश संपत्ती ही बर्कशायरच्या समभागांच्या रुपाने त्यांच्याकडे आहे.
जगभरात असंख्य गुंतवणूकदारांचे प्रेरणास्थान
वॉरेन बफे हे अमेरिका आणि येथील भांडवलशाही व्यवस्थेतील सद्गुण, सदाचाराचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी देशाच्या विकासात गुंतवणूक केली. उपजत शहाणपणा आणि सकारात्मक बाबींतून व्यवसाय करण्यावर त्यांनी भर दिला.- जेमी डिमॉन, मुख्याधिकारी, जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी
वॉरेन बफे यांच्यासारखा दुसरा व्यक्ती होणार नाही. त्यांनी त्यांच्या ज्ञानातून माझ्यासह असंख्य जणांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीला व्यक्तिगत आयुष्यात ओळखणे हा माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे.- टिम कूक, मुख्याधिकारी, ॲपल