वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जगभरात चर्चेचा विषय असलेल्या आभासी चलन बिटकॉईन सात महिन्यातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. चालू वर्षात ऑक्टोबर महिन्यात विक्रमी उसळी घेत पहिल्यांदाच १.२६ लाख अमेरिकी डॉलर पातळीपुढे मजल मारणारे या लोकप्रिय कूटचलनातील, नोव्हेंबर अखेरीस ९१,००० डॉलरपर्यंतची घसरण ही गुंतवणूकदारांना होरपळून काढणारी ठरली आहे.

एका ‘बिटकॉईन’चे मूल्य सात महिन्यांत प्रथमच ९१,००० डॉलरच्या खाली घसरले आहे. ज्यामुळे २०२५ अखेरपासून त्यात सुरू असलेली घोडदौड आता शमल्याचे म्हटले जात असून, हा एकूणच डिजिटल मालमत्ता परिसंस्थेला मोठा धक्का आहे. ऑक्टोबरच्या १.२६ लाख डॉलर या विक्रमी उच्चांकावरून त्यात ३५ टक्क्यांची घसरण तीव्र रूपात झाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जशास तसे व्यापार शुल्क योजनेमुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये निराशेचे वातावरण आहे. वाढत्या आर्थिक अडचणींमध्ये व्याजदर धोरणाने नवीन चिंता निर्माण केली आहे. डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता असल्याने जगभरातील शेअर बाजार अलीकडील उच्चांकावरून घसरले आहेत. गुंतवणूकदार जोखमीबाबत अधिकाधिक दक्ष बनले आहेत. यामुळे ‘बिटकॉईन’मध्ये आणखी घसरणीची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘बिटकॉईन’ने १ लाख डॉलरची पातळी गमावल्यानंतर हा आभासी चलन बाजार निरंतर खाली येत आहेत, असे मोनार्क ॲसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय भागीदार शिलियांग टांग म्हणाले.

‘बिटकॉइन’चे सध्याचे मूल्य किती?

‘बिटकॉइन’ने मंगळवारच्या सत्रात ९१ हजार डॉलरच्या पातळीपर्यंत रोडावले. जागतिक बाजारात एका बिटकॉइनचे मूल्य ९१,५२३ अमेरिकी डॉलर अर्थात भारतीय रुपयात ते सुमारे ८१,०७,३४४ रुपये झाले आहे. विद्यमान वर्ष २०२५ मध्ये ‘बिटकॉइन’चे मूल्य जेवढ्या जलद गतीने वाढले तेवढ्याच जलद गतीने ते गडगडले आहे.