मुंबई : सरकारी मालकीची दूरसंचार सेवा प्रदात्या बीएसएनएलने मंगळवारी जानेवारी ते मार्च २०२५ या तिमाहीत २८० कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. आधीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ या तिमाहीतही कंपनीने २६२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. यातून वाढत्या स्पर्धेत मागे पडलेल्या आणि आर्थिक स्थिती बेताची असलेल्या या कंपनीने सलग दोन तिमाहीत नफ्याची कामगिरी नोंदविली आहे.
भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने गतवर्षी याच जानेवारी ते मार्च तिमाहीत, ८४९ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. अंतिम दोन तिमाहीतील नफ्यामुळे, नुकत्याच संपलेल्या २०२४-२५ आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण तोटा ५८ टक्क्यांनी घटून २,२४७ कोटी रुपयांवर घसरला आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षात कंपनीचा तोटा ५,३७० कोटी रुपयांवर होता. बीएसएनएलचे हे केवळ पुनरुज्जीवन नाही तर कंपनीने चोखाळलेल्या नव्या वाटेवरील हा प्रवास सुरू झाला आहे, असे बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जेरार्ड रवी म्हणाले.
दीपक फर्टिलायझर्सकडून १०० टक्के लाभांशाची घोषणा
मुंबई: रसायने आणि खतांचे प्रमुख उत्पादक असलेल्या दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यात १०२ टक्के अर्थात दुपटीहून अधिक वाढून ९४५ कोटी रुपये झाला आहे. जानेवारी ते मार्च २०२५ या चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वर्षभरापूर्वीच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मधील १७ टक्क्यांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५ मध्ये स्पेशालिटी रसायने उत्पादनांचा महसुलातील वाटा २२ टक्के झाला आहे. हे परिवर्तन नवोन्मेषपूर्ण उत्पादनांच्या वाढीमुळे अधिक मजबूत झाले आहे. या उमद्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांमध्ये १०० टक्के लाभांश वितरणाची शिफारस केली आहे.