मुंबई: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वाधिक रोजगार (प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात सुमारे लाखभर) मिळवून देणारी टाटा समूह, इन्फोसिस यांच्या बरोबरीला असलेली अग्रणी कंपनी आहे. शिवाय रिलायन्स ही सरकारला सर्वाधिक कर महसूल मिळवून देणारीही आघाडीची कंपनी आहे. हा कर महसूलही इतका की, त्यातून देशातील अनेक ग्रामीण कुटुंबांनाही रोजगार व उपजिविकेचा त्यातून आधार मिळाला आहे. अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर (मनरेगा) केंद्र सरकारने २०२३-२४ आर्थिक वर्षात केंद्र सरकारने खर्च केलेल्या निधीच्या दुप्पट योगदान एकट्या रिलायन्स समूहाकडून आले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने गुरुवारी तिचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीने कर रूपाने एकूण २,१०,२६९ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने सरकारच्या तिजोरीत पहिल्यांदाच २ लाख कोटींपेक्षा अधिक योगदान कर रूपाने दिले आहे. याआधी २०२३-२४ मध्ये १,८६,४४० कोटी रुपये, वर्ष २०२२-२३ मध्ये १,७७,१७३ कोटी रुपयांचा कर भरणा तिने केला होता, असे कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालातून गुरुवारी स्पष्ट झाले. आर्थिक वर्ष २०२० ते २०२५ या सहा वर्षांत रिलायन्सने एकूण १० लाख कोटींपेक्षा अधिक कर तिने सरकारकडे जमा केला आहे.

देशांतर्गत भांडवली बाजारात २० लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडणारी रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव कंपनी आहे. सध्याच्या बाजार पडझडीत तिचे बाजार भांडवल १८.८० लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. तरी मागील १० वर्षांत ते पाच पटींनी वाढले आहे. अर्थात भागधारकांना तिने पाच पटींहून अधिक लाभ मिळवून दिला आहे. जागतिक पटलावर सर्वाधिक बाजार भांडवल असणाऱ्या आघाडीच्या ५० कंपन्यांच्या पंक्तीत तिचे स्थान आहे.

अंबानी ‘शून्य’ वेतनावर कार्यरत

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सलग पाचव्या वर्षी कंपनीकडून ‘शून्य’ वेतन घेतले आहे. मात्र कंपनीकडून दिला जाणारा लाभांश त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत राहिला आहे. २००८ ते २०२० पर्यंत त्यांनी वार्षिक १५ कोटी रुपये वेतन घेतले होते. मात्र आर्थिक वर्ष २०२१ पासून म्हणेजच करोनाच्या काळापासून त्यांनी कंपनीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी वेतन नाकारले, जो क्रम अद्याप कायम आहे. नवीनतम वार्षिक अहवालानुसार, पगार, भत्ते आणि अनुलाभ तसेच सेवानिवृत्ती लाभ म्हणून त्यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एक रुपयाही मिळविलेला नाही. तथापि १०० अब्ज डॉलरच्या वैयक्तिक मालमत्तेसह ते जगातील १८ वे श्रीमंत व्यक्ती आहेत.

मुकेश अंबांनींची रिलायन्समधील थेट १.६१ कोटी शेअर्सची मालकी आहे. ज्यातून आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी कंपनीने जाहीर केलेल्या ५.५० रुपये प्रति शेअर लाभांशाप्रमाणे त्यांना ८.८५ कोटी रुपये लाभांश उत्पन्न मिळाले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाकडे रिलायन्सची सुमारे ५०.०७ टक्क्यांहून अधिक मालकी आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रवर्तक समूह कंपन्यांकडे ६६४.५ कोटी शेअर आहेत, त्यातून एकत्रित ३,६५५ कोटी रुपये लाभांश उत्पन्न त्यांना प्राप्त होते.