वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या किमतीत केंद्र सरकारकडून ३३.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. याबरोबरच विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) दर किलोलिटरमागे २,५२६ रुपयांनी म्हणजेच ३ टक्क्यांनी शुक्रवारी वाढ करण्यात आली. तेल कंपन्यांनी वाणिज्य एलपीजीच्या किमतीत ३३.५० रुपयांनी कपात केल्याने १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत आता १,६३१.५० रुपये (दिल्ली) झाली आहे. मुंबईत वाणिज्य एलपीजीची किंमत आता प्रति सिलिंडर १,५८३ रुपये आहे.

व्यावसायिक एलपीजीच्या दरात ही सलग पाचवी कपात आहे. १ जुलै रोजी १९ किलोच्या सिलिंडरसाठी ५८.५ रुपयांची शेवटची कपात करण्यात आली होती. त्यापूर्वी १ जून रोजी २४ रुपयांनी, १ मे रोजी १४.५० रुपयांनी आणि १ एप्रिल रोजी प्रति सिलिंडर ४१ रुपयांनी कपात करण्यात आली होती. एप्रिलपासून एकूण १७१.५ रुपयांनी किमती कमी करण्यात आल्या आहेत. घरगुती वापराच्या स्वयंपाकाच्या गॅसचा दर मात्र ८५३ रुपये प्रति सिलिंडरवर कायम आहे. एप्रिलमध्ये घरगुती एलपीजीच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

यासोबतच विमानाच्या इंधनाचे दर मुंबईमध्ये दर किलोलिटरमागे ८३,५४९.२३ रुपयांवरून ८६,०७७.१४ रुपयांपर्यंत वाढले आहेत. तर दिल्लीत आता हे दर किलोलिटरमागे २,६७७.८८ रुपयांनी म्हणजेच २.९ टक्क्यांनी वधारून ९२,०२१.९३ रुपयांवर पोहोचले असल्याचे सरकारी तेल कंपन्यांनी स्पष्ट केले. या विमान इंधनाच्या दरात गेल्या महिन्यात ७.५ टक्के (६,२७१.५ रुपये प्रति किलोलीटर) वाढ करण्यात आली होती, ज्यामुळे विमान कंपन्यांचा कार्यचालन खर्च वाढला होता. जुलैमधील ही वाढ एप्रिलपासून सुरू झालेल्या तीन मासिक कपातीनंतर करण्यात आली. एकूण, तीन कपातींमध्ये किमती १२,२३९.१७ रुपये प्रति किलोलीटर कमी करण्यात आल्या होत्या. एटीएफच्या किमतीत झालेली वाढ ही भू-राजकीय तणाव आणि व्यापार युद्धांनंतर आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीशी सुसंगत आहे. या वाढीमुळे व्यावसायिक विमान कंपन्यांवर भार वाढेल. विमान कंपन्यांचा परिचालन खर्चाच्या जवळपास ४० टक्के खर्च इंधनावर होतो. यामुळे विमानाचा प्रवास महागण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमान कंपन्यांचे समभाग जमिनीवर

केंद्र सरकारने विमान इंधनाचे दर वाढवल्याने इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो) आणि स्पाइसजेटचे समभाग शुक्रवारच्या सत्रात घसरले. दिवसअखेर इंडिगोचा समभाग १२१ रुपयांनी घसरून ५,७८९.५० रुपयांवर स्थिरावला. तर स्पाइसजेटचा समभाग २.५७ टक्क्यांनी घसरून ३५.६१ रुपयांवर बंद झाला.