नवी दिल्ली : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या तिमाहीसाठी सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी) तसेच अन्य अल्पबचत आणि पोस्टाच्या योजनांचे व्याजदर सध्या आहेत, त्याच पातळीवर कायम राहतील, असा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयाने मंगळावारी जाहीर केला. सलग सातव्या तिमाहीसाठी पीपीएफ आणि एनएससीसह विविध अल्प बचत योजनांसाठी व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ठेवींवर ८.२ टक्के व्याजदर मिळेल, तर पोस्टाच्या तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील दर चालू तिमाहीत ७.१ टक्के राहील.
लोकप्रिय सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ आणि पोस्ट ऑफिस बचत ठेव खात्यावर व्याजदर अनुक्रमे ७.१ टक्के आणि ४ टक्के प्रति वर्ष असे कायम ठेवण्यात आले आहेत. किसान विकास पत्रावरील व्याजदर ७.५ टक्के असेल आणि ही गुंतवणूक ११५ महिन्यांत परिपक्व होईल.

ऑक्टोबर-डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील (एनएससी) व्याजदर ७.७ टक्के राहील. चालू तिमाहीप्रमाणे, मासिक उत्पन्न योजना गुंतवणूकदारांसाठी ७.४ टक्के उत्पन्न दिले जाईल. यासह, पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर सलग सहाव्या तिमाहीत अपरिवर्तित ठेवण्यात आले आहेत.

अल्पबचत योजनांचे व्याजदर हे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून दर तिमाहीला आढावा घेऊन निर्धारित केले जात असतात. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीपासून अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. याआधी काही योजनांमध्ये आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत शेवटचे बदल केले गेले होते. 

योजना आणि त्यावर मिळणारे व्याज

सुकन्या समृद्धी योजना     ८.२ टक्के

पोस्टाच्या तीन वर्षांच्या मुदत ठेवी     ७.१ टक्के

भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ   ७.१ टक्के

पोस्ट ऑफिस बचत ठेव   ४ टक्के

किसान विकास पत्र   ७.५ टक्के

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी)   ७.७ टक्के

मासिक उत्पन्न योजना   ७.४ टक्के