Ashwin Dani: देशातील सर्वात मोठी पेंट्स उत्पादक कंपनी एशियन पेंट्सचे सह संस्थापक अश्विन दाणी यांचे वयाच्या ७९ वर्षी निधन झाले. त्यांनी एशियन पेंट्सचे बिगर कार्यकारी संचालक पद भूषवले आणि ते कंपनीच्या बोर्डाचे सदस्यही होते. एशियन पेंट्समधील त्यांचा प्रवास १९६८ मध्ये सुरू झाला आणि नंतरच्या वर्षांत त्यांनी कंपनीचे नेतृत्वही केले. एशियन पेंट्स ही आज भारतातील सर्वात मोठी पेंट्स कंपनी आहे आणि त्यात अश्विन दाणी यांचे मोठे योगदान मानले जाते. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये अश्विन दाणी यांची एकूण संपत्ती ७.१ अब्ज डॉलर आहे.

अश्विन दाणी यांचा जन्म २६ सप्टेंबर १९४४ रोजी मुंबईत झाला. १९६६ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात बीएस्सी पदवी मिळवली. त्यानंतर ते अमेरिकेत (यूएसए) गेले आणि तेथे त्यांनी अक्रॉन विद्यापीठातून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. डेट्रॉईटमध्ये त्यांनी केमिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. १९६८ मध्ये त्यांनी एशियन पेंट्स या त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात प्रवेश केला.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एशियन पेंट्सचा महसूल ३४,४८८ कोटी रुपये होता, ज्यावर कंपनीने ४१०१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. आजमितीस एशियन पेंट्सचे बाजार भांडवल ३०३,३४१ कोटी रुपये आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात एशियन पेंट्सचा शेअर ४.२१ टक्क्यांच्या घसरणीसह ३१६२ रुपयांवर व्यवहार करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एशियन पेंट्सची सुरुवात १९४२ मध्ये झाली. चार मित्रांनी मिळून एशियन पेंट्स कंपनी सुरू केली आणि १९६७ पर्यंत ही कंपनी देशातील सर्वात मोठी पेंट्स कंपनी बनली. आज एशियन पेंट्स जगातील टॉप १० पेंट्स कंपन्यांमध्ये आहे. कंपनी आशियामध्ये दुसऱ्या आणि जगात आठव्या क्रमांकावर आहे. एशियन पेंट्स १५ देशांतून कार्यरत आहेत आणि ६० देशांमध्ये त्यांची उपस्थिती आहे. कंपनीकडे २७ उत्पादन सुविधा आहेत.