Dead body illustration on ITR portal : प्राप्तिकर विभागाच्या अधिकृत इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) ई-फाइलिंग पोर्टलवर सोशल मीडियवर चांगलीच टीका केली जात आहे. याचे कारण पोर्टलवर सेशन एक्सपायर्ड पेजवर दाखवण्यात आलेली कलाकृती ठरली आहे. मुदतीच्या अखेरच्या दिवशी लोक रिटर्न फाईल करत असताना त्यांना हे आर्टवर्क दाखवले गेले, यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर याचे स्क्रीनशॉट शेअर करत टीका केली आहे.
नेमकं फोटोमध्ये काय आहे?
या फोटोमध्ये एक व्यक्ती आडवा झोपलेला दिसत असून त्याला हार घालण्यात आलेला आहे आणि त्याच्या बाजूलाच एक वितळलेली मेणबत्ती दिसत आहे. अनेकांनी हे चित्र मृतदेहासारखे दिसत असल्याचे म्हटले आहे. हे ग्राफिक निष्क्रियतेमुळे सेशन एक्सपायर्ड झाल्याचे दाखवण्यासाठी वापरण्यात आले, पण यामुळे यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, “प्राप्तिकर विभागाने वापरलेली ही कलाकृती नेमकी काय आहे? सेशन एक्सपायर्ड झाल्यासाठी मृतदेह? हे खूपच अपमानास्पद आहे.”
दुसऱ्या एका युजरने एक राजस्थानी पारंपरिक नृत्यप्रकाराचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्याला ‘घूमर घूमर’ असा कॅप्शन दिलं आहे. “आरटीआर फाइलिंग पोर्टल बी लाईक: तुमचे रिटर्न्स विसरा आणि त्याऐवजी आमच्या मोफत ‘घूमर डान्स’ शो (free show) पाहा. जेव्हा जेव्हा सेशन एक्पायर्ड पॉप अप येतो, तेव्हा मला असे वाटते की मी इन्कम टॅक्स नाही, तर संयमाचा रिटर्न भरत आहे.”
प्राप्तिकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची मूळची अंतिम मुदत संपण्याच्या काही मिनिटांपूर्वी ती एक दिवसाने वाढवून १६ सप्टेंबर केली होती. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आय-टी विभागाने पोस्ट करत मुदत एक दिवसाने वाढवत असल्याचे जाहीर केले होते.
“सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयटीआर भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर, २०२५ वरून १६ सप्टेंबर, २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे या पोस्टमध्ये म्हटले होते. याबरोबरच युटीलिटीजमधील बदल करण्यासाठी १६ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे २.३० पर्यंत ई-फायलिंग पोर्टल मेंटनन्स मोडमध्ये राहिल असे त्यामध्ये म्हटले होते.
ज्या करदात्यांनी अंतिम मुदतीपर्यंत आयकर रिटर्न भरलेला नाही, ते ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न दाखल करू शकतात. मात्र, यासाठी त्यांना १,००० ते ५,००० रुपये विलंब शुल्क भरावे लागेल आणि इतर काही लाभ देखील सोडून द्यावे लागतील.