गोवा: घर, दुकानाची सुरक्षा म्हणजे ‘गोदरेज कुलूप’ हे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून रूढ झाले आहे. गोदरेज नाममु्द्रेच्या या विश्वासार्हतेच्या बळावर गोदरेज समूहाला आधुनिक जमान्याच्या डिजिटल कुलपांच्या श्रेणीत मोठी व्यवसाय संधी खुणावत असून, या श्रेणीत १००० कोटींची उलाढाल गोदरेज समूह गाठेल, असा विश्वास गोदरेज लॉक्स अँण्ड आर्किटेक्चरल फिटिंग्ज सिस्टीम्सचे व्यवसाय प्रमुख श्याम मोटवानी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.

सर्वोत्तम वास्तुरचना आणि भविष्यावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांचा गौरव करणाऱ्या तिसऱ्या ‘जीवीज’ पुरस्काराच्या पूर्वसंध्येला गोव्यात आयोजित सोहळ्याच्या निमित्ताने त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गोदरजे लॉक्सचे गोव्यात दोन, तर राज्याच्या सीमेला लागून महाराष्ट्रात कुडाळ येथे तिसरा उत्पादन प्रकल्प सध्या कार्यरत आहे.‘वास्तुशास्त्र’ आणि ‘अंर्तगत सजावट’ यावर गोदरेज समूहाचा भर आहे. सदनिकेतील इंच इंच जागा उपयोगात आणली जाईल, या दृष्टीने नियोजनपूर्वक सजावट करून सदनिकेचा प्रशस्ततेत भर दिला जात आहे.

हेही वाचा >>>अमेरिकेतील चौकशीशी कसलाही संबंध नसल्याचा ‘अदानी ग्रीन’चा खुलासा; त्रयस्थ कंपनीशी निगडित भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असल्याचा दावा

वास्तुशास्त्रीय सुलभीकरणावर भर दिल्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस गोदरेज समूहाच्या सेवा पडत आहेत. त्यामुळे ग्राहकांची अशा सेवांबाबत रूची वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्राला देशात सर्वत्रच मोठे भवितव्य तसेच कंपनीला व्यवसाय वाढवण्याची संधीही दिसून येत आहे. ‘गोदरेज समूह यंदा या उत्पादन श्रेणीत १००० कोटींहून अधिक उलाढालीचा टप्पा पार करेल, याबद्दल माझ्या मनात संशय नाही,’ असा आशावाद मोटवानी यांनी व्यक्त केला.
‘डिजिटल लॉक’वर कंपनीने लक्ष केंद्रीत केलेले आहे. शहरी भागात ही एक महत्त्वाची संकल्पना असून त्याबाबत शहरी ग्राहकांमध्ये आकर्षण आहे. ग्राहकांमध्ये वाढलेली विश्वासार्हता आणि स्वीकृती पाहता, निवासी आणि औद्योगिक अशा दोन्ही ग्राहक प्रकारात व्यवसायवाढीला भरपूर वाव असल्याचेही मोटवानी यांनी यावेळी स्पष्ट केले.