मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीमुळे देशाच्या परकीय चलन गंगाजळीला सलग दुसऱ्या आठवड्यात झळ पोहोचली. १९ एप्रिलला समाप्त आठवड्याच्या कालावधीत गंगाजळी २.२८ अब्ज डॉलरने कमी होऊन ६४०.३३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट केले. आधीच्या आठवड्यातही परकीय चलन गंगाजळी ५.०४ अब्ज डॉलरने घटली होती. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला ६४८.५६ अब्ज डॉलर या सार्वकालिक उच्चांकी पातळीला पोहोचलेली परकीय चलन गंगाजळी सध्या सहा आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गडगडली आहे.

पश्चिम आशियातील संघर्षाच्या चिंतेमुळे गेल्या आठवड्यात रुपया ८३.५७ या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला होता. मात्र रिझर्व्ह बँकेच्या डॉलर विक्रीद्वारे झालेल्या हस्तक्षेपानंतर तो किंचित सावरला. त्यावेळी डॉलर निर्देशांक १०५.६ वर होता, तर बहुतेक आशियाई चलने डॉलरच्या तुलनेत खाली घसरली. जागतिक पातळीवरील भू-राजकीय चिंता, अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची मावळलेली आशा आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या निधी निर्गमनाचे एकंदर परिणाम रुपयाच्या घसरणीतून निदर्शनास येत आहेत. यापूर्वी करोना काळ आणि त्यानंतर देखील रिझर्व्ह बँकेने डॉलरच्या तुलनेत रुपयातील अस्थिरता कमी करण्यासाठी डॉलर खर्ची घातला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The country foreign exchange reserves have dwindled due to the depreciation of the rupee against the dollar print eco news amy
First published on: 27-04-2024 at 07:33 IST